जनजागृती, योगा, व्यायाम, मानसिक आधार; कोरोना लढ्यात गणेशोत्सव समितीचे 500 कोविड योद्धा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकार-पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘कोरोना लढ्या’त आता गणेशोत्सव समन्वय समितीचे 500 कोविड योद्धेही सहभागी होणार आहेत. यामध्ये कोरोनाबाबत जनजागृती, योगा, व्यायामासह, निर्जंतुकीकरण, रुग्ण आणि संशयितांना मानसिक आधार देण्याचे काम केले जाणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेली ही टास्क फोर्स संपूर्ण मुंबईत काम करणार आहे.

राज्य सरकार आणि पालिकेनेही गणेशोत्सवासाठी नियमावली तयार करून दिल्यामुळे आवश्यक खबरदारी घेऊनच उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना गणेशोत्सव समितीची टास्क फोर्स मदत करणार आहे. यामध्ये प्रत्येक विभागात 20 जणांची टीम सहकार्यासाठी तैनात ठेवण्यात येईल. या तरुणांना ओळखपत्र आणि ड्रेस कोडही देण्यात येईल, अशी माहिती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळांच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे, रक्तदान, प्लाझ्मा दान असे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

असे होणार काम

कोरोनामुळे आलेले नैराश्य घालवण्यासाठी ऑनलाइन योगा, व्यायाम प्रशिक्षण देण्यात येईल. रुग्ण-संशयितांच्या मनातील भिती घालवण्यासाठी मानसिक आधारही दिला जाईल.  आवश्यकतेनुसार निर्जंतुकीकरण मोहीमही राबवण्यात येईल. जनजागृतीसाठी भित्ती पत्रके आणि विविध माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन करण्यात येईल. या कामात कोविड योद्ध्यांच्या आरोग्याची काळजीही समन्वय समिती घेईल.

स्वयंसेवक, गणसेवक, कोविड योद्धा!

रुग्ण-संशयितांना मार्गदर्शन करणे, रुग्णालय-अ‍ॅम्ब्युलन्सने जादा बिल आकारल्यास न्याय मिळवून देणे ही कामेही करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे राज्य सरकार आणि पालिकेने घालून दिलेल्या नियमांचे पालन मंडळांकडून होते की नाही यावरही कोविड योद्ध्यांची नजर राहणार आहे. कोविड योद्ध्यांसह विसर्जनावेळी मदत-सहकार्य करण्यासाठी लाइफ गार्डच्या धर्तीवर गणसेवक, मंडपात खबरदारी आणि आपत्कालीन स्थिती घडल्यास कार्यवाही वेगाने करण्यासाठी स्वयंसेवक तैनात असतील.