
सप्टेंबरमध्ये होणार्या जेईई व नीटच्या परीक्षा डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी देशभरातील पालकांनी केंद्र सरकारकडे केली आहे. दरवर्षी 25 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी जेईई व नीट परीक्षा देतात. त्यामुळे सप्टेंबरमध्ये परीक्षा घेतल्यास आरोग्य सुरक्षा पुरवण्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते तसेच विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भिती पालकांकडून वर्तवण्यात येत आहे.
कोरोनामुळे विविध परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र जेईई व नीट या परीक्षा रद्द करण्याऐवजी त्या पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी इंडिया काईड पॅरेंट्स असोसिएशन या पालक संघटनेने मनुष्यबळ विकास मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे पत्राद्वारे केली आहे. कोरोनामुळे अनेक विद्यार्थी हे आपल्या मूळ गावी गेले आहेत. कंटेमेंट झोन असलेल्या ठिकाणांकरील विद्यार्थी घराबाहेर पडू शकत नाहीत. इंजिनियरींग प्रवेशासाठीची जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर, जेईई ऍडव्हान्स 27 सप्टेंबर आणि वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची नीट परीक्षा 13 सप्टेंबरमध्ये होणार आहे. परंतु देशातील कोरोनाची बिकट परिस्थिती पाहता ही परीक्षा डिसेंबरपर्यंत ढकलण्यात यावी अशी मागणी इंडिया काईड पॅरेंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा अनुभा सहाय यांनी केली आहे.


























































