गडचिरोलीत पावसाची संततधार, पर्लकोटा नदीला पूर; 50 गावांचा संपर्क तुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या 18 तासांपासून संततधार पावसामुळं गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडच्या पर्लकोटा नदीला आलेला पूर आला असून, यामुळं भामरागडची बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. या पुरामुळं भामरागडच्या पुढे असलेल्या सुमारे 50 ते 60 गावांचा संपर्क तुटला. बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास पर्लकोटा नदीचे पाणी वाढले तेव्हापासून वाहतूक ठप्प झाली आहे. त्यापूर्वी चोवीस तासआधी हा मार्ग सुरू झाला होता. पण छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात कोसळलेल्या मुसळधार पावसानं ही नदी भरली आणि 24 तासांनंतर पुन्हा हा मार्ग बंद पडला. याशिवाय भामरागडच्या पुढे असलेल्या जुवी नाल्याला पण पूर आल्यानं अंतर्गत वाहतूकही ठप्प झाली. आलापल्ली ते भामरागड मार्गावर ताडगावजवळ नाल्याला पूर आल्यानं हा मार्गही बंद झालाय. त्यामुळं दोन्हीकडे जाणारी वाहनं अडकून पडली आहेत. अजूनही जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. भामरागड येथील सखल भागातील घरंही पाण्याखाली आल्यानं तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं.