
कोरोना संकटातच बिहारच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी बिहारची निवडणूक पुढे ढकलली जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण आता सप्टेंबरच्या तिसर्या आठवड्यात बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरूवारी एका कार्यक्रमात निवडणूका जाहीर होतील अशी शक्यता वर्तवली आहे. बिहार विधानसभेचा कार्यकाल 29 सप्टेंबर रोजी संपणार आहे.
बिहारमध्ये 243 जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होऊ शकतात. मिळालेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णही मतदान करू शकतात, त्यांच्यासाठी वेगळ्या बुथची सोय करण्यात येणार आहे. सोमवारी निवडणूक आयोग राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांशी चर्चा करणार आहे. तसेच या दरम्यान निवडणूक मार्गदर्शन सूचनेवरही चर्चा होणार आहे.
बूथ वाढवण्याची शक्यता
कोरोनाची संबंधित नियमांमुळे यंदा बूथची संख्या 50 टक्क्यांनी वाढू शकते. तसेच निवडणुकीच्या कामासाठी कर्मचारी PPE किट घालून काम करतील. 2015 च्या निवडणुकीत 72 हजार बूथ होते. या निवडणुकीत 1 लाखपेक्षा अधिक बूथ असतील असा अंदाज व्यक्त होत आहे.

























































