
मैत्रीणासोबत काढलेला सेल्फी सोशल मिडीयावर अपलोड करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग करुन खंडणी उकळणाऱ्या सख्ख्या भावडांविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव दिलीप कातोरे आणि रोशन दिलीप कातोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोथरुड येथे राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी तरुणी आणि कातोरे भावंडे मुळचे नाशिकचे आहेत. शिक्षण घेत असताना नाशिकमध्येच 2011 मध्ये त्यांची एका कोचिंग क्लासमध्ये ओळख झाली होती. शिक्षणानंतर तरुणी नोकरीसाठी पुण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसानंतर वैभव आणि रोशनही पुण्यात वास्तव्यास आले. त्यानंतर त्यांनी तरुणीला वारंवार फोन करून लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली. तरुणीच्या कंपनीमध्ये जाउन तेथील कर्मचाऱ्यांना दोघांनी दमबाजी करीत तरुणी बायको असून, तीच्याशी नीट वागायचे असा दम दिला. याच कालावधीत तरुणीचे कुटूूंबिय लग्न ठरवण्याचा प्रयत्न करीत होते.
जेव्हा वैभवला तरुणीच्या लग्नाबाबत समजले तेव्हा त्याने सेल्फी सोशल मिडीयावर अपलोड करून तिच्या नवऱ्याला पाठविण्याची धमकी दिली. त्यानुसार दोघा भावडांनी तरुणीला ब्लॅकमेलिंग करत जबरदस्तीने साडेसात हजार रुपये पाठवण्यास सांगितले. रोशन याने तरुणीला फोन करून मी मोबाईलच्या दुकानात आलो असून, वैभवला फोन घ्यायचा आहे असे सांगून धमकी देत 14 हजार रुपये किंमतीचा मोबाईल घेऊन देण्यास भाग पाडले. वैभव हा तरुणीकडे एकतर्फी प्रेमातून सतत लग्न करण्यासाठी तगादा लावत होता. मात्र तरुणी त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार देत होती. यातूनच त्यांनी तरुणीला सतत त्रास दिला. त्यामुळे तरुणीने त्रासाला कंटाळून पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक किरण बालवडकर तपास करत आहेत.


























































