कोपरगाव शहरात पुन्हा चार दिवस 100 टक्के लॉकडाऊन; कोरोनासाखळी तोडण्यासाठी निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव शहरात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाची संपर्क साखळी तोडण्यासाठी कोपरगाव शहरात शुक्रवारपासून पुन्हा चार दिवसांच्या कडक लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. त्यामुळे गुरूवारी (27 ऑगस्ट) रोजी दिवसभर शहरातील दुकाने सुरू राहणार असून नागरिकांनी आवश्यक असणारा भाजीपाला, किराणामाल व इतर सामान खरेदी करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे. शहरात शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार चार दिवस कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. या काळात वैद्यकीय सेवा, औषध दुकाने, दूध डेअरी, बँक व पतसंस्था या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

शहरात गेल्या तीन दिवसात जवळपास 100 पेक्षा जास्त रुग्णांची भर पडली आहे. कोपरगाव शहरातील ज्या भागांमध्ये रुग्णांची संख्या आढळून आली आहे. त्या भागामध्ये प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची कोरोना लक्षणांबाबतची आरोग्य तपासणी करण्याचे प्रशासनाने नियोजन केले आहे. घराघरात जाऊन नमुने तपासणी करण्यात येणार आहे. ज्या घरात तीनपेक्षा जास्त व्यक्ती कोरोनाबाधित आढळतील, त्यांना क्वारंटाइन करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि आलेल्या सूचनेवरून प्रशासनाने पुन्हा चार दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. याी काळात शहराच्या सर्व भागातील छोटे-मोठे व्यवसाय पूर्ण बंद राहतील. रस्त्यांवर नागरिकांची ये-जा आता बंद करण्यात येणार आहे . मुख्य चौकात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अधिकारी शहरभर गस्त घालणार आहेत.