
जम्मू-कश्मीरच्या शोपीयान भागातील किलोरा येथे झालेल्या जोरदार चकमकीत हिंदुस्थानी लष्कराने 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला असून एकाला 2 एके -47 आणि 3 पिस्तुलांसह ताब्यात घेतले आहे. कश्मीर खोऱयातील 2 आठवडाभरातील चकमकीत सुरक्षा बलांनी 10 दहशतवाद्यांना ठार केले आहे.
जम्मू- कश्मीरात दहशतवाद माजविणाऱया कडव्या दहशतवाद्यांना ठार करून हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तान समर्थित टोळ्यांचे कंबरडेच मोडले आहे. त्यामुळे चवताळलेल्या पाकिस्तान आणि आयएसआयने आता स्थानिक गँगस्टर्सना हाताशी धरून आपले नापाक मनसुबे यशस्वी करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत कश्मीर खोऱयातील चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांत स्थानिक हिंदुस्थानी गुंडांचा अधिक समावेश असल्याचे उघड झाले आहे.
17 आणि 18 ऑगस्टला बारामुल्लाच्या करीरी भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा बलांनी 3 कडव्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यात लश्कर ए तोयबाचे दोन कमाण्डर सज्जाद ऊर्फ हैदर आणि विदेशी दहशतवादी उस्मान यांचा समावेश होता. याच उस्मानने भाजप नेते वसीम बारी आणि त्यांच्या पिता व भावाची निर्घृण हत्या केली होती. हैदर हा बंदीपोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी होता. तो कश्मिर खोऱयात ‘लश्कर’ नव्या युवकांची भरती करण्याचे काम पाहत होता. 19 ऑगस्टच्या चकमकीत हिंदुस्थानी लष्कराने शोपीयानमध्ये 1 तर हंदवाराच्या गनिपोरामध्ये 2 दहशतवाद्यांना ठार केले होते.

























































