संभाजीनगर पोलीस आयुक्तपदी निखिल गुप्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

15 वर्षांपूर्वी शहरात उपायुक्तपदाचा पदभार सांभाळणारे निखिल गुप्ता यांची संभाजीनगर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर मावळते पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली. यात चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दोन वर्षे संवेदनशील शहराचा यशस्वीरीत्या कारभार सांभाळणारे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची बदली नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर तर केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून परत आलेले निखिल गुप्ता यांची संभाजीनगर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंघल यांची मुंबई येथील महाराष्ट्र राज्य वैद्यमापन शास्त्राचे नियंत्रकपदी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक असलेले के. एम.एम. प्रसन्ना यांची संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, संभाजीनगर पोलीस आयुक्तपदी नियुक्त झालेले निखिल गुप्ता यांचा संभाजीनगरात दांडगा संपर्क असून ते 15 वर्षांपूर्वी पोलीस उपायुक्तपदावर कार्यरत होते.