
बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालविणाऱ्या रॅकेटच्या म्होरक्याला मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने बेड्या ठोकल्या. मालाड येथून आरोपीच्या मुसक्या आवलल्या नंतर पोलिसांनी त्याच्याकडून 40 लाखाची रोकड आणि 10 लाख किंमतीची सोन्याची बिस्किटे, गांजा व गांजाने भरलेली सिगारेट्स हस्तगत केली आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर एक बोगस कॉल सेंटर चालवले जात असून त्या रॅकेटचा म्होरक्या निशांत शिरसीकर (30) हा तरुण असून तो मालाड येथे असल्याची माहिती गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाचे प्रमुख सचिन वाझे तसेच रियाझ काझी, नितीन लोंढे, प्रकाश होवाळ, रघुवीर पाटील व पथकाने तत्काल शोधमोहीम राबवून निशांतला पकडले. त्यावेळी त्याच्या अंगझडतीत पाच लाख रोख, गांजा आणि गांजाने भरलेली सिगारेट तसेच एक संशयीत चोरीची दुचाकी मिळाली. निशांत हा देशातील विविध शहरांमधून साथीदारांच्या मदतीने घरातूनच मोबाईलद्वारे बोगस कॉल सेंटर चालवून अमेरिका व कॅनडातील नागरिकांची कोट्यवधी डॉलर्सची फसवणूक करत होता.


























































