
जालना पोलीस मुख्यालयात सहाय्यक फौजदाराने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जालना पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार सुभाष गायकवाड मंगळवारी सकाळी 8.45 वाजता पिस्तूल जमा करण्यासाठी मुख्यालयाच्या शस्त्रागार विभागात गेले होते. त्यावेळी शस्त्रागार विभागाच्या मागे जाऊन त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) अभय देशपांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, संजय लोहकरे, यशवंत जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. या घटनेमुळे जालना पोलीस दलात खळबळ उडाली आहे.




























































