राज्यात 24 तासांत कोरोनाचे 20 हजार रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात गेल्या 24 तासांत 20 हजार 131 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 9 लाख 43 हजार 772 वर पोहचली आहे. दरम्यान, आज दिवसभरात एकूण 13 हजार 234 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे. आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत एकूण 47 लाख 89 हजार 682 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी एकूण 9 लाख 43 हजार 772 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या राज्यात एकूण 2 लाख 43 हजार 446 ऍक्टिव्ह रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाने आज जाहीर केले आहे.

मुंबईत दिवसभरात 1,346 कोरोना रुग्ण
मुंबईत आज दिवसभरात 1,346 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत 887 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता 1 लाख 25,906 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 42 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत 42 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 7 हजार 939 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 63 दिवसांवर पोहोचला आहे.न

नागपूरचे जिल्हाधिकारी कोरोनाबाधित

राज्याच्या उपराजधानीची कोरोना संदर्भातील परिस्थिती अतिशय बिकट होत चालली आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनाही कोरोनाने विळख्यात घेतले आहे. यापूर्वी माजी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हेसुद्धा बाधित झाले होते. कालच ते कोरोनामुक्त झाले. आज एकाच दिवशी 2205 नवीन बाधित रुग्ण आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे तर 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1803 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

पुण्यात 1880 रुग्ण
पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने 1880 रुग्ण आढळल्याने, 1 लाख 9 हजार 838 एवढी रुग्णसंख्या झाली आहे. तर आज दिवसभरात 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर 2 हजार 584 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर उपचार घेणाऱया 2022 रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर 90 हजार 601 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.