हिंदुस्थानचा हवाई बाहुबली देणार पहिले सार्वजनिक दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गगनभेदी आवाजाने आणि तुफानी वेगाने शत्रूंच्या मनात धडकी भरवणारे राफेल लढाऊ जेट विमाने येत्या गुरुवार, 8 ऑक्टोबरला हिंदुस्थानी हवाई दिन संचलनाच्या निमित्ताने देशातील जनतेला जाहीर दर्शन देणार आहेत. हिंदुस्थानात आगमन झाल्यानंतर पहिल्यांदाच देशाचा हा ‘हवाई बाहुबली’ सर्वसामान्य नागरिकांना आपल्या शक्तीचे प्रदर्शन घडवणार आहे.

फ्रान्सकडून विकत घेतलेले राफेल हे दोन इंजिनांचे हायटेक लढाऊ विमान 4.5 जनरेशनचे जेट मानले जाते. हवाई युद्धातील अजेय योद्धा म्हणून या विमानाची ख्याती आहे. कारण अफाट वेग, प्रचंड ताकद, तुफानी मारक क्षमता आणि मोठय़ा संख्येने अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता यामुळे हवाई युद्धात राफेल जेटची भीती शत्रूला वाटते. राफेलच्या समावेशाने हिंदुस्थानी हवाई दलाचे सामर्थ्य अनेकपटीने वाढले आहे.

– लडाख सीमेवरील संभाव्य युद्धासाठी सज्ज
हिंदुस्थानच्या लडाखी सीमेवर सध्या चीनच्या कुरापतींमुळे वातावरण तणावपूर्ण आहे. जगातील सर्वात उंच युद्धभूमीवरील युद्धात हायटेक राफेल अतिशय निर्णायक आणि प्रभावी कामगिरी बजावू शकतात. त्यामुळे हिंदुस्थानी हवाई दलाने आपल्या ताफ्यात नव्याने सामील झालेली राफेल जेट चीनने आक्रमणाची आगळीक केल्यास प्रत्युत्तरासाठी सज्ज ठेवली आहेत. आपले हवाई दल सुसज्ज करण्यासाठी हिंदुस्थानने सप्टेंबर 2016 मध्ये 36 राफेल जेट खरेदीचा करार केला आहे. हा सौदा 59 हजार कोटी रुपयांचा आहे. सध्या हिंदुस्थानाला प्राप्त झालेली 5 राफेल अंबाला येथील हवाई तळावर उड्डाणासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. हिंदुस्थानी हवाई दलाच्या ‘गोल्डन एरोज’ पथकात ही लढाऊ जेट समाविष्ट करण्यात येतील. हिंदुस्थानच्या या बलाढय़ हवाई योद्धय़ाचे दर्शन आणि त्याची ताकद गुरुवारच्या हवाई दल दिन संचलनात नागरिकांना अनुभवता येईल, असे हिंदुस्थानी हवाई दल प्रमुख आर. के. एस.भदौरिया यांनी सांगितले.