
उत्तर प्रदेश हाथरस येथील बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला असताना या पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेले काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी, त्याचप्रमाणे प्रियंका गांधी यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. याबाबत विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी खेद व्यक्त केला असून याप्रकरणी जबाबदार पोलीस अधिकारी, कर्मचाऱयांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी सक्षम सरकारी वकील नेमण्यात यावा, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.
नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात हाथरस बलात्कार घटनेतील पीडितेच्या कुटुंबाला उत्तर प्रदेश पोलिसांचे सहकार्य लाभत नाही. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित होत आहे. तपासात ज्या ज्या अधिकाऱयांकडून दिरंगाई झाली, त्यांच्यावर कारवाई करावी. आरोपींना एक महिन्याच्या आत शिक्षा व्हायलाच हवी. यासाठी या कुटुंबाला सक्षम सरकारी वकील मिळाले पाहिजेत अशी अपेक्षा ना. डॉ. गोऱहे यांनी व्यक्त केली आहे.



























































