कोरोना संसर्गाच्या भितीचे सावट यंदा गणेशोत्सवाच्या पाठोपाठ नवरात्रोत्सवावर राहण्याची शक्यता आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे नवरात्रोत्सवासाठी चार फूट उंचीची दुर्गादेवीची मूर्ती साकारत आहोत. पण, यंदा अद्याप शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील सार्वजनिक मंडळांनी मुर्तीची विचारणा केलेली नाही. नवरात्रोत्सव पंधरा दिवसांवर आला आहे, तेव्हा मूर्ती किती घडवायच्या की घडवायच्या नाहीत, असा संभ्रम मूर्तीकारांमध्ये निर्माण झाला आहे. कोरोनाच्या भीतीने नवरात्रोत्सव मंडळांनी साजरा केला नाही तर मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ येईल, अशी प्रतिक्रिया खरे यांनी दिली.
जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पाठोपाठ नवरात्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा होतो. त्यामुळे या काळात अनेकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे रोजगार मिळतो. पण, यंदा कोरानाची भीती सर्वांना आहे. सहा महिन्यांपासून अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडले आहेत. अनेकांनी नोकऱया गमावल्या आहेत. तर अनेकांचे व्यवसाय परिस्थितीमुळे आजही बंद आहेत. त्यात मूर्तिकारांचा समावेश आहे. त्यांना सण-उत्सवांची चाहूल सर्वप्रथम लागते. ज्या मंडळाच्या ठिकाणी कोरोना बाधीत आढळले तर त्या मंडळांच्या पदाधिकाऱयांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे अनेक मंडळांनी यंदा गणेशोत्सव साजरा केला नाही. दुसरीकडे मूर्तीची उंची चार फूट असावी, असे सांगण्यात आले आहे.
दुर्गादेवीची मूर्तीदेखील चार फूट उंचीची असेल. पण, नवरात्रोत्सव पंधरा दिवसांवर आला तरी शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील सार्वजनिक मंडळांकडून अद्याप मूर्तीबाबत विचारणा झालेली नाही. अनेक मंडळे नवरात्रोत्सव साजरा करणार नाहीत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे माती आणि रंगांचे दर वाढले आहेत. तेव्हा दुर्गा देवीच्या किती मूर्ती साकारायचा. साकारलेल्या मुर्ती मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून खरेदी झाल्या नाहीत तर करायचे, अशा अनेक प्रश्नांनी संभ्रम निर्माण केला आहे.



























































