
पुणे शहरातील खराडी परिसरात मोकळ्या मैदानावर कुख्यात गुंडाचा दगडांनी ठेचून खून करण्यात आला. आज पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शैलेश घाडगे (वय 33) असे खून झालेल्या कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे. चंदन नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील नैवेद्यम हॉटेलशेजारी मैदानाजवळ एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानुसार चंदनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता मृतदेह कुख्यात गुंड शैलेश घाडगे याचा असल्याचे समजले. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना बोलावले आहे. शैलेश घाडगे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचा खून कोणी आणि का केला हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही. मात्र पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर कुख्यात गुंड शैलेस घाडगे कारागृहाबाहेर आला होता. काही दिवसांपुर्वी त्याची एकाशी भांडणे झाली होती. त्यातूनच त्याचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
– शंकर खडके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस ठाणे





























































