
आयआयटी दिल्लीने जेईई अॅडव्हान्स्ड-2020 परीक्षेचा निकाल आज जाहीर केला. आयआयटी मुंबईच्या चिराग फलोर याने या परीक्षेत देशात पहिला रँक मिळवला. मूळचा पुण्याचा असलेल्या चिरागने 396 पैकी 352 गुण मिळवले. मुलींमध्ये आयआयटी रुरकीची कनिष्का मित्तल हिने 315 गुण मिळवून देशात मुलींमध्ये टॉपर येण्याचा मान मिळवला. कनिष्का ही उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथील रहिवासी आहे. मुंबईच्या स्वयम चुबे याने या परीक्षेत देशात आठवा रँक मिळवला.
जेईई अॅडव्हान्स्ड-2020 परीक्षेत 43 हजार 204 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यात 6 हजार 707 मुलींचा समावेश आहे. देशात पहिला रँक मिळवलेल्या चिरागने गेल्या जानेवारी महिन्यात झालेल्या जेईई-मेन परीक्षेतही 99.9897 पर्सेंटाईल मिळवले होते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये झालेल्या जेईई-मेन परीक्षेत 100 पर्सेंटाईल मिळवून देशात 12 वा रँक मिळवला होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा यंदा पुढे ढकलण्यात आली होती. 27 सप्टेंबर रोजी 222 शहरांमधील एक हजार परीक्षा केंद्रांवर दोन सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. जेईई-मेन परीक्षेत उत्तीर्ण झालेले अडीच लाख विद्यार्थी जेईई-अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरले होते. परंतु 1 लाख 60 हजार विद्यार्थ्यांनीच जेईई-अॅडव्हान्स्डसाठी नोंदणी केली होती. त्यातील 96 टक्के विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती.
निकालाला 50 मिनिटे उशीर
आयआयटी दिल्लीने आज सकाळी दहा वाजता निकाल जाहीर करण्याची घोषणा केली होती. परंतु सर्व्हर डाऊन झाल्याने निकालाला 50 मिनिटे विलंब झाला.
आयआयटींमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू
जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल घोषित झाल्यानंतर देशभरातील 23 आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. या आयआयटी संस्था आता आपला कट-ऑफ जाहीर करतील. उद्या 6 ऑक्टोबरपासून या कट-ऑफनुसार विद्यार्थी प्रवेशासाठी समुपदेशन राऊंडमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. त्यासाठी आयआयटी संस्थांनी काऊन्सिलिंग पोर्टल उपलब्ध करून दिली आहेत.
देशातील ‘टॉप 10’
- रँक 1 – चिराग फलोर (पुणे, महाराष्ट्र)
- रँक 2 – गंगुला भुवन रेड्डी (विजयवाडा, आंध्र प्रदेश)
- रँक 3 – वैभव राज (बिहार, बेगुसराई)
- रँक 4 – आर. महेंद्र राज (बंगळुरू)
- रँक 5 – केशव अग्रवाल (गुरूग्राम, दिल्ली)
- रँक 6 – हार्दिक राजपाल (मधापूर, तेलंगणा)
- रँक 7 – वेदांग धीरेंद्र आसगावकर (पुणे, महाराष्ट्र)
- रँक 8 – स्वयम शशांक चुबे (मुंबई, महाराष्ट्र)
- रँक 9 – हर्षवर्धन अग्रवाल (हरियाणा)
- रँक 10 – ध्वनित बेनीवाल



























































