शत्रूला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची क्षमता हिंदुस्थानी हवाई दलात आहे- हवाईदल प्रमुख आर. के. एस. भदौरिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीच्या संकटात हिंदुस्थानी हवाई दलाने शेजारी देशांना सतत मदत केली आहे. आम्ही शेजारधर्म चांगलाच निभावतो. पण पुणी शत्रूराष्ट्र आमच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणार असेल तर त्यांना त्याचा भाषेत प्रत्युत्तर देण्याची क्षमता आमच्या हवाई दलात आहे, असा ठाम विश्वास हिंदुस्थानचे हवाई दलप्रमुख आर.के.एस. भदौरिया यांनी गाझियाबाद येथील 88 व्या हवाई दल दिन सोहोळ्यात बोलतांना व्यक्त केला. या सोहोळ्याप्रसंगी हिंदुस्थानी लढाऊ विमानांनी अफलातून कसरती दाखवत उपस्थितांच्या नजरेचे पारणे फेडले.

टेहेळणीसाठी ड्रोनची तैनाती आवश्यक
येणारे दशक हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आव्हानात्मक असेल याची जाणीव आम्हाला आहे. त्यात हिंदुस्थानच्या प्रदीर्घ सीमांचे रक्षण आणि टेहेळणी करण्यासाठी ड्रोनची तैनाती करणे आता आवश्यक ठरणार आहे. आम्हाला सायबर हल्ला, ड्रोनद्वारे पाळत ठेवणं यांसारख्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. परंतु नेहेमीप्रमाणेच हवाईदल प्रत्येक आव्हानासाठी स्वतःला तयार करत आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र, रोहिणी रडार, तेजस विमान आणि आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा हिंदुस्थानी तंत्रज्ञानाने विकसित केली गेली आहे. या वर्षाच्या अखेरीस हिंदुस्थानी हवाईदल पूर्णपणे पेपरलेस बनविण्याचे लक्ष्य आहे. तिन्ही सैन्यदलांच्या समन्वयासाठी संरक्षण प्रमुखांची (सीडीएस )नेमणूकही उत्तम असल्याचेही ते म्हणाले.