
शिवनेरी सेवा मंडळाच्या वतीने गेली 50 वर्षे सातत्याने होणारी कबड्डी स्पर्धा या वर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. प्रथम विकास मंडळाच्या वतीने भगवान पालव चषका अंतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असे. कालांतराने ती बंद पडली. त्यानंतर ही स्पर्धा शिवनेरी सेवा मंडळाच्या विद्यमाने उदय लाड यांच्या सहकार्याने राजाराम लाड चषकासाठी सुरू केली. ती आजतागायत सुरू होती. मुंबईतील कबड्डी हंगामाची सुरुवात या स्पर्धेपासूनच सुरू होते, अशी या स्पर्धेची ओळख आहे. गेली कित्येक वर्षे ही परंपरा कायम होती ती कोरोनामुळे या वर्षी खंडित झाली.
कोरोनामुळे जरी यंदा ही स्पर्धा होऊ शकत नाही तरी ती उणीव एका वेगळ्या पद्धतीने भरून काढण्याचा मानस या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यानिमित्ताने 17 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार यांच्या ऑन-लाईन मुलाखती घेण्यात येतील. त्या फेसबुक व यू-टय़ूबच्या माध्यमातून कबड्डीप्रेमींपर्यंत पोहचवून या स्पर्धेतील जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा यानिमित्ताने प्रयत्न करण्यात येईल. त्याचबरोबर नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने शासन नियमाचे काटेकोरपणे पालन करून कोरोनाविरोधात विभागात जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच रक्तदान शिबीर मोठय़ा प्रमाणात आयोजित करून यातून सामाजिक बांधिलकीदेखील जपली जाणार आहे, अशी माहिती या पत्रकाद्वारे प्रकाश भोसले (9664875051) व किरण मोरजकर यांनी संयुक्तरीत्या प्रसार माध्यमाकरिता दिली आहे.

























































