
हाथरसमध्ये बलात्कार झालाच नाही असा दावा भाजप खासदार मोहन मांडवी यांनी केला आहे. तसेच हाथरस प्रकरणाचा गवगवा करून काँग्रेसचे नेते तिथे पोहोचले असेही मांडवी म्हणाले.
मोहन मांडवी छत्तीसगडच्या कांकेर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. छत्तीसगडमध्ये एका 18 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कर झाला होता. त्या मुलीने नंतर आत्महत्या केली. या घटनेच्या विरोधात मांडवी यांनी धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी मांडवी म्हणाले की, हाथरस बलात्कार बनावटी आहे, तिथे बलात्कार झालाच नाही, काँग्रेस नेते त्या ठिकाणी सातत्याने भेटी देत आहेत. जर सीबीआय चौकशी झाली तर प्रत्येक गावात एखादी अशी घटना घडलेली असते. मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी मांडवी यांनी केली आहे.
बस्तरमध्ये एका आदिवासी मुलीवर बलात्कार झाला तेव्हा काँग्रेसचे नेते कुठे होते, त्यांनी आपले तोंड का लपवले, आदिवासींचे हितचिंतक कुठे गेले असा सवाल मांडवी यांनी विचारला आहे.

























































