
वडगाव बुद्रुकमध्ये आई- वडिलांची क्रूरता उघडकीस आली आहे. 13 दिवसांचे चिमुरडे दिव्यांग असल्यामुळे दोघांनी त्याला गोदावरी हॉस्टेलच्या पाठीमागील जंगलात पुरल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळी सिंहगड रोड पोलीस दाखल झाले आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड भागातील वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजच्या पाठीमागे गोदावरी हॉस्टेल आहे. या भागात जंगल असल्यामुळे नागरिकांची वर्दळ कमी असते. परिसरातील एका दाम्पत्याने 13 दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिला होता. मात्र, बाळ दिव्यांग जन्माला आल्यामुळे आई-वडिलांनी त्याला जंगलात खड्डा खोदून पुरले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड पोलिसांनी धाव घेतली. दरम्यान तहसीलचे अधिकारी आल्यानंतर खड्डा खोदण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी गर्दी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


























































