
कोरोना विषाणू संदर्भात रोज नवीन माहिती समोर येत आहे. कोरोना विषाणूमुळे काही रुग्णांची ऐकण्याची क्षमता कमी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका अभ्यासादरम्यान ‘यूके’मध्ये अशाच एका कोरोना रुग्णाची नोंद करण्यात आली.
युकेमधील लंडन विद्यापीठ आणि इतर शास्त्रज्ञांच्या मते, या संभाव्य दुष्परिणामांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची आवश्यक आहे. असे का होत आहे, यामागचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही, असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. बीएमजे केस रिपोर्ट्स या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात दम्याने ग्रस्त असलेल्या 45 वर्षीय व्यक्ती बद्दल माहिती सांगण्यात आली आहे. या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला. या रुग्णाला यूकेच्या रॉयल नॅशनल थ्रोट नॉस अँड इअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाची लागण झाल्यानंतर या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 10 दिवसांपासून उपचार घेत असलेल्या या रूग्णाला श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने अतिदक्ष उपचारांकरिता स्थानांतरित करण्यात आले. अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, त्याला 30 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले गेले, ज्या दरम्यान त्याच्यात इतर लक्षण दिसून आले. या रुग्णाच्या कानाची तपासणी केली असता, त्यांना त्याच्या कानात कोणतीही सूज किंवा इतर कोणतेही वेगळे अडथळे दिसून आले नाही. मात्र त्याची कानाची पूर्ण तपासणी केली असता, या रुग्णाच्या डाव्या कानाची ऐकण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट झाल्याचे शास्त्रज्ञांना आढळले.



























































