
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत गेल्या 15 महिन्यांत 26.26 टक्क्यांची वाढ झाली. गेल्या वर्षी त्यांच्याजवळ 2 कोटी 49 लाखांची संपत्ती होती. यंदा 30 जूनपर्यंत त्यात 2 कोटी 85 लाख रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. बॅंकेतील बचत आणि एफडीमुळे वर्षभरात संपत्ती 36 लाख रुपयांनी वाढली आहे. मोदींचे दरमहा वेतन 2 लाख रुपये असून गांधीनगरमध्ये 1 कोटी 10 लाखांचा भूखंड आणि घर असल्याची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान व केंद्रीय मंत्र्यांनी जूनपर्यंतच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचा तपशील पंतप्रधान कार्यालयापुढे जाहीर केला आहे. त्या तपशीलानुसार मोदींकडे केवळ 31,450 रुपयांची रोख रक्कम आहे. तसेच बॅंक खात्यात 3 लाख 38 हजार रुपये आहेत. 31 मार्च 2019 रोजी त्यांच्या खात्यात केवळ 4,143 रुपये होते, तर एफडीमध्ये 1 कोटी 27 लाख 81 हजार 574 रुपये होते. यात 1 कोटी 60 लाख 28 हजार 39 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. ते 8 लाख 43 हजार 124 रुपयांच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटच्या माध्यमातून कर बचत करतात. तसेच जीवन विम्यासाठी 1 लाख 50 हजार 957 रुपयांचा प्रिमिअम भरतात. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ते एप्रिलपासून 30 टक्के कमी वेतन घेत आहेत.
अमित शहा म्हणतात, संपत्ती कमी झाली!
शेअर बाजारातील चढ-उतारामुळे वर्षभरात माझी संपत्ती कमी झाली, असे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. त्यांनी जाहीर केलेल्या तपशीलानुसार, गेल्या वर्षी 32 कोटी 30 लाखांची संपत्ती होती. यंदा जूनपर्यंत त्यात 28 कोटी 63 लाखांपर्यंत घट झाली. त्यांच्याकडे 13 कोटी 56 लाखांच्या 10 स्थावर मालमत्ता, तर 44 लाखांचे दागिने आहेत. तसेच बॅंक खात्यात 1 कोटी, विमा पॉलिसींचे 13 लाख 47 हजार रुपये व एफडीमध्ये 2 लाख 79 हजार रुपये आहेत.
मोदी म्हणतात, ना कर्ज, ना कार!
माझ्या डोक्यावर कुठलेही कर्ज नाही, तसेच स्वतःची एकही खाजगी कार नाही. गांधीनगरचा भूखंड आणि घराव्यतिरिक्त माझ्याजवळ सोन्याच्या चार अंगठ्या आहेत, असा दावा मोदींनी केला आहे. दुसरीकडे, स्टेट बँकेच्या गांधीनगर शाखेतील त्यांच्या फिक्स डिपॉझीटच्या रक्कमेत वाढ झाली आहे. गेल्यावर्षी ही रक्कम 1 कोटी 27 लाख रुपये होती. यंदा ती 1 कोटी 60 लाखांपर्यंत वाढली आहे.


























































