
टीआरपी घोटाळय़ातील तीन आरोपींनी ‘रिपब्लिक टीव्ही’च्या खोटय़ा कर्माची पोलखोल केली आहे. टीआरपी रॅकेटमध्ये आम्ही सहभागी होतो, विशिष्ट चॅनेल बघण्यासाठी लोकांना पैसे दिले जात होते, आम्हाला तर टीआरपी वाढवण्यासाठी ‘रिपब्लिक टीव्ही’च्या अधिकाऱयांनी थेट पैसे दिले, अशी स्पष्ट कबुली तीन आरोपींनी न्यायदंडाधिकाऱयांपुढे दिली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.
टीआरपी घोटाळ्यात अटक केलेल्या पाच आरोपींपैकी चौघांचे फौजदारी कलम 164 अन्वये न्यायदंडाधिकाऱयांपुढे जबाब नोंदवण्यात आले. यातील एकाने ’बॉक्स सिनेमा’चे नाव घेतले. उर्वरित तिघांनी ‘रिपब्लिक टिव्ही’चा बुरखा फाडला. यात एक हंसा रिसर्चचा कर्मचारी आहे. ‘रिपब्लिक टिव्ही’ने स्वत:चा टीआरपी वाढवण्यासाठी आम्हाला पैसे दिले, त्यांच्या सांगण्यावरुन आम्ही लोकांना पैसे देऊन चॅनेल बघण्यासाठी भाग पाडले, अशी कबुली आरोपींनी दिली आहे. मुंबई पोलिस या तिघांना आता साक्षीदार म्हणून न्यायालयासमोर उभे करणार आहेत. आरोपी स्वेच्छेने जबाब नोंदवण्यास तयार आहेत, अशी खात्री पटल्यानंतरच न्यायदंडाधिकारी जबाब नोंदवून घेतात. त्यामुळे या प्रकरणात तीन आरोपींनी दिलेल्या जबाबामुळे मुंबई पोलिसांची बाजू भक्कम झाली आहे, असे परमवीर सिंह म्हणाले.
आणखी एकाला विरारमधून अटक
टीआरपी घोटाळ्यात आणखी एकाला मुंबई क्राईम ब्रँचने विरार येथून अटक केली. उमेश मिश्रा असे त्याचे नाव असून तो हंसाचा माजी कर्मचारी आहे. त्याच्या अटकेने आरोपींची संख्या आता सहा झाली आहे. तर आज क्राईम ब्रँचने एबिक्स कश कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयाचाही जबाब नोंदवला. गुप्तवार्ता विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि युनिट 9 चे प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांचे पथक विरारला गेले. तेथून आज उमेशला पोलिसांनी अटक केली.



























































