महाराष्ट्राचे जीएसटीचे 30 हजार कोटी मिळवण्यासाठी प्रयत्न करा, सत्कार करू – बाळासाहेब थोरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील भाजप नेते मोठय़ा मोठय़ा मागण्या करत आहेत, पण केंद्र सरकारकडे असलेले महाराष्ट्राच्या हक्काचे पैसे मिळावेत, यासाठी प्रयत्न करत नाहीत. भाजप नेत्यांनी पोकळ गप्पा मारण्याऐवजी जीएसटीचे 30 हजार कोटी आणि राज्याला केंद्राकडून मोठी आर्थिक मदत मिळावी, यासाठी पंतप्रधान मोदींकडे प्रयत्न करून भरघोस निधी आणल्यास सत्कार करू, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक संकट आहे. त्यात अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे, पण तो अद्याप केलेला नाही. महाराष्ट्र हे केंद्र सरकारला सर्वात जास्त कर देते, परंतु राज्याला मात्र मदत करताना केंद्राकडून हात आखडता घेतला जातो. सप्टेंबरअखेर राज्याचे हक्काचे असलेले जीएसटी परताव्याचे तब्बल 30 हजार कोटी रुपये केंद्राकडून येणे बाकी आहेत ते तरी त्यांनी आधी द्यावेत, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली.

राज्य सरकारला पगार आणि इतर दैनंदिन खर्चासाठी लागणारा 55 हजार कोटी रुपयांचा निधी कर्जरोख्यांच्या माध्यमातून उभारला आहे. कोरोनामुळे महसूल कमी झाला आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू असून परिस्थिती बदलल्यानंतर चित्र बदलेल, परंतु सद्यस्थितीत कर्ज काढावे लागत आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना मदत करणारच असल्याचे थोरात म्हणाले.