ऍप है तो तिकीट है! लोकल गर्दीवर मोबाईल उतारा, रेल्वेने राज्य सरकारची पंचसूत्री नाकारली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आता सर्वांसाठी लोकल सुरू करा असे पत्र राज्य सरकारने बुधवारी रेल्वे मंत्रालयाला पाठवले आणि सोबत ट्रेनमधील गर्दी कमी करण्यासाठी ‘पंचसूत्री’ ही सुचवली. मात्र मध्य आणि पश्चिम रेल्वेने सरकारच्या ‘पंचसूत्री’लाच आक्षेप घेतला आहे. गर्दीची विभागणी वेगवेगळय़ा वेळांमध्ये करावी असे सरकारचे म्हणणे असले तरी ‘पिकअवर’ला हा उपाय कामी येणार नाही. वेळेनुसार गर्दी विभागायची असेल तर कोलकात्याप्रमाणे खास मोबाईल अॅप आणावे लागेल, असे पत्रच रेल्वेने राज्य सरकारला पाठवले आहे. त्यामुळे लोकल प्रवासाची सर्वसामान्यांची आशा सध्या तरी लांबणीवर गेली आहे.

1 पश्चिम रेल्वेने पूर्वीप्रमाणे 1367 फेऱया सुरू केल्या तरी ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखायचे तर एका लोकलमध्ये 700 प्रवासी याप्रमाणे केवळ 9.6 लाख प्रवाशांचीच वाहतूक करता येईल

2 सोशल डिस्टन्सिंग राखायचे तर पश्चिम रेल्वेचे 9.6 लाख आणि मध्य रेल्वेचे 12.4 लाख अशा केवळ 22 लाख प्रवाशांची वाहतूक आता शक्य आहे.

3 प्रत्येक तासाला लेडीज स्पेशल चालवल्यास पुरुष प्रवाशांसाठी लोकलच्या फेऱया कमी होतील, यामुळे स्थानकावर गर्दी वाढेल.

4 कोलकातामध्ये ज्याप्रमाणे प्रवाशांना ठरावीक वेळेतच तिकीट मिळण्यासाठी अॅप वापरले तशी आधुनिक यंत्रणा विकसित करावी.

पश्चिम रेल्वे कोविड-19 आधी दररोज 1367 लोकल फेऱयांद्वारे दररोज 35 लाख प्रवाशांची वाहतूक करीत होती. त्यावेळी प्रत्येक लोकलमध्ये सरासरी 2560 प्रवासी प्रवास करतात. सकाळी 7.30ते 11.30 आणि सायं. 5.09 ते रा. 9 या पिकअवरमध्ये तर पश्चिम रेल्वेवर एका लोकलमध्ये 4,500 प्रवासी प्रवास करतात.

सध्या कोरोनामुळे पश्चिम रेल्वेवर केवळ 704 फेऱया चालविण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वेने पूर्वीप्रमाणे 1367 फेऱया सुरू केल्या तरी ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखायचे तर एका लोकलमध्ये 700 प्रवासी याप्रमाणे केवळ 9.6 लाख प्रवाशांचीच वाहतूक करता येईल असे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.

दर तासाला लेडीज स्पेशल व्यवहार्य नाही

पश्चिम रेल्वेवर दहा लेडीज स्पेशल चालविण्यात येतात. तर सामान्य लोकलमधील 23 टक्के आसने महिलांसाठी राखीव असतात. मध्य रेल्वे चार लेडीज स्पेशल चालविते. तर नऊ लोकलमधील 27 डबे महिलांसाठी राखीव असतात. दर तासाला महिला स्पेशल चालविण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव व्यवहार्य नसल्याचे म्हटले आहे. प्रत्येक तासाला लेडीज स्पेशल चालवल्यास पुरुष प्रवाशांसाठी लोकलच्या फेऱया कमी होतील यामुळे स्थानकावर गर्दी वाढेल, असे रेल्वेने म्हटले आहे.

केवळ 22 लाख प्रवाशांची वाहतूक

मध्य रेल्वेनेही आपण कोविड-19 आधी दररोज 1774 फेऱयांद्वारे 45 लाख प्रवाशांची वाहतूक करायचो. तसेच पिकअवरच्या वेळी एका ट्रेनमध्ये 4500 प्रवाशांची वाहतूक होते असे म्हटले आहे. सध्या मध्य रेल्वे 706 फेऱया चालवत असून संपूर्ण 1774 फेऱया जरी चालवल्या तर कोविड-19 च्या नियमानुसार प्रत्येकी एका फेरीत 700 प्रवासी घेतले तर 45 लाखांऐवजी केवळ 12.4 लाख प्रवाशांचीच वाहतूक करता येईल असे मध्य रेल्वेने म्हटले आहे. पश्चिम रेल्वेचे रोजचे 35 लाख आणि मध्य रेल्वेचे 45 लाख अशा 80 लाख प्रवाशांची दररोज वाहतूक केली जाते. परंतु सोशल डिस्टन्सिंग राखायचे तर पश्चिम रेल्वेचे 9.6 लाख आणि मध्य रेल्वेचे 12.4 लाख अशा केवळ 22 लाख प्रवाशांची वाहतूक आता शक्य आहे.

यूटीएस अॅपमध्येही गर्दी रोखणारे तंत्रज्ञान नाही

सर्वसामान्यांना एकदा का लोकल खुली केली तर तिकीट सर्वांना उपलब्ध करावे लागेल. सध्या बंद असलेले मोबाईल ई-तिकीट विकणारे यूटीएस अॅपही उघडावे लागेल. सध्या विशिष्ट वर्गाला तिकीट खरेदीस बंदी करणारे तंत्रज्ञान या अॅपमध्येही नाही. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी विशिष्ट वर्गास तात्पुरते रोखण्याचे तंत्रज्ञान शोधावे लागेल. पश्चिम बंगालने कोलकातामध्ये यासंदर्भात पावले उचलली आहेत. राज्य सरकारनेही असे अॅप विकसित करण्यासंदर्भात रेल्वेशी 22 आणि 27 ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत चर्चा केली होती. राज्य सरकारला सर्व इनपुट देण्यास रेल्वे तयार असून राज्य सरकारने उपाय शोधावा असे रेल्वेने म्हटले आहे.