यंदाचा बालदिवस ऑनलाईन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये होणारा बालदिवसही यंदा ऑनलाईन साजरा होणार आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शिक्षण विभागाने बाल दिवस सप्ताह सुरू करण्याचा निर्णय घेतला असून पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी 14 नोव्हेंबर रोजी बालदिवस साजरा करण्यात येतो. बालदिवस निमित्ताने 8 ते 14 नोव्हेंबरदरम्यान सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. हा उपक्रम सात गटांमध्ये होणार आहे. यामध्ये पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना ‘मी नेहरू बोलतोय’ या विषयावर तीन मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे. तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ‘पत्रलेखन’ हा विषय असून, त्यांना चाचा नेहरूंना पत्र लिहायचे आहे. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कविता वाचन आणि नेहरूंच्या जीवनावर एकपात्री, नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वांतत्र्य संग्रामातील नेहरुंच्या जीवनावरील पोस्टर तयार करणे व निबंध लेखन स्पर्धा घेण्यात येणार आहे. अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निबंध लेखन आणि व्हिडिओ तयार करायचा आहे. तसेच विद्यार्थ्यांनी बनवलेले व्हिडिओ, निबंध, कविता, पत्रलेखन, ई-संमेलनाचे फोटो हे पालक, शिक्षक यांच्या फेसबुक अकाऊंटवरून #baldivas2010 या हॅशटॅगचा वापर करून अपलोड करायचे आहेत.

अकरावीच्या विद्यार्थ्यांचाही सहभाग
बालदिवसानिमित्त साजऱ्या होणाऱ्या उपक्रमामध्ये अकरावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आल्याने पालक व शिक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. अद्याप अकरावीचे प्रवेश झालेले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना उपक्रमात कसे सहभागी करणार, असा प्रश्न शिक्षकांकडून विचारण्यात येत आहे.