
कोरोना महामारीचे संकट संपल्यावर रत्नागिरी जिल्ह्याला पायाभूत, मुलभूत सुविधांकरीता ग्रामविकास खात्यामार्फत भरघोस निधी उपलब्ध करुन देणार असून कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, बंदरविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. म्हाप्रळ – आंबेत पुलावरील वाहूतकीस पर्याय देणाऱ्या फेरीबोटीच्या जेटीच्या कामाचे भूमीपूजन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते म्हाप्रळ येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
सावित्री नदीवरील म्हाप्रळ – आंबेत पुल नादुरुस्त झाल्याने सध्या अवजड वाहतूकीस बंद आहे. पुलाचे सदृढीकरणाचे काम सुरु असल्याने वाहतूक पुर्णपणे बंद होणार असल्याने म्हाप्रळ पंचक्रोशीतील नागरीकांची पुलाअभावी मोठी अडचण होणार ही बाब लक्षात घेतल्याने पुलाचे काम सुरु असतानच तत्कालीन उपाययोजना म्हणून म्हाप्रळ आंबेत फेरी बोट सुरु करावी अशी ग्रामस्थांची मागणी होती. सार्वजनीक बांधकाम विभागाने या मागणीच्या अनुषंगाने पाहणी करुन बोटीसाठी म्हाप्रळ व आंबेत अशा दोन्ही ठिकाणी जेटीची आवश्यकता व्यक्त केली होती. ग्रामस्थांची ही मागणी मान्य होऊन जेटीसाठी निधीची तरतूद झाल्याने सत्तार यांच्या उपस्थितीत जेट्टीच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.
नुकसान भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याबाबत प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे निर्देश अब्दुल सत्तार यांनी दिले. पंचायत समिती सभागृह मंडणगड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
खार जमिन विकास करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलण्यात येत आहे. हर्णे, बाणकोट, बुरोंडी यासारख्या बंदरांचा विकास करण्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल. जांभा दगड बंदी उठवण्याबाबतचा अंतिम निर्णय झाला असून लवकरच याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात येतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. पंचायत समिती मंडणगडच्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी तसेच ग्रामीण भागातील जोडरस्ते दुरुस्तीसाठी लवकरच निधी दिला जाईल असेही त्यांनी सांगितले.
सत्तार यांनी हर्णे बंदराची पाहणी केली. हर्णे बंदरावर जेट्टी उभारण्याच्या स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीचा विचार केला जाईल असे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांच्या मागणीनुसार आंजर्ले खाडीतील गाळ काढण्याची कार्यवाही केली जाईल. तुळशी येथील महिला बचतगटांना भेट देवून बचतगटाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या हळद लागवडीची पाहणी केली.
मंडणगड तालुक्यातील आंबडवे या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी भेट देवून तेथील समस्या त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी याकुब बाबा दरगाहला भेट दिली तसेच आडखळ खाडीची पाहणी करुन खाडीमध्ये साचलेला गाळ उपसून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.































































