
फ्रान्समध्ये मोहम्मद पैंगबर यांच्या कार्टूनवरून अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्यांविरोधात फ्रान्सने कठेर भूमिका घेतली आहे. तसेच सुरक्षेसाठी सीमाभागात सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. सीमारेषेजवळ असणाऱ्या सैनिकांची संख्या दुपटीने वाढवण्यात येत आहे. तसेच महत्त्वाच्या ठिकाणी तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
फ्रान्समध्ये विविध ठिकाणी होणारे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी आणि सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत राष्ट्रपती इमॅन्युयल मॅकौं यांनी माहिती दिली आहे. सीमाभागातील बंदोबस्त दुपटीने वाढवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. देशात होणारी घुसखोरी आणि तस्करी रोखणे यामुळे शक्य होणार आहे. फ्रान्स आणि स्पेनच्या समीरेषेवर अवैध घुसखोरी करणाऱ्या 11 हजार जणांना वर्षभरात पकडण्यात आल्याची माहिती सीमेजवळील पोलिसांनी दिली आहे.
बाहेरच्या देशातील दहशतवादी फ्रान्समध्ये शिरून घुसखोरी करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सीमाभागात बंदोबस्त वाढवून घुसखोरी होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. असे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी सीमाभागातील बंदोबस्त वाढवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तसेच युरोपीय देशांकडेही सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे मॅकौं यांनी सांगितले. फक्त फ्रान्सच नाही तर ऑस्ट्रिया आणि इतर देशातही दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडत आहेत.
फ्रान्समध्ये मोहम्मद पैंगबर यांच्या कार्टूनवरून वाद झाल्यावर दहशतवादी हल्ल्याच्या घटना होत आहेत. शाळेत एका शिक्षकाने पैंगबर यांचे कार्टून दाखवल्यानंतर विद्यार्थ्याने शिक्षकाची हत्या केली होती. त्यानंतर पॅरिससरह इतर शहरातही दहशतवादी हल्ले करण्यात आले होते. याविरोधात कठोर भूमिका घेण्यात येईल, असे फ्रान्सने जाहीर केले होते. यातील काही हल्ल्यांची जबाबदारी अल कायदाने घेतल्यानंतर फ्रान्सने अल कायदाच्या काही तळांवर हवाई हल्ले केले होते. त्यात 50 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले होते.




























































