सिटी सेंटर मॉलमध्ये बेकायदा बांधकाम, बेसुमार भाडेवसुली!  स्थायी समितीत पुन्हा खडाजंगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलमध्ये लागलेल्या आगीवरून स्थायी समितीत आज पुन्हा एकदा चांगलीच खडाजंगी झाली. सिटी सेंटर मॉलमध्ये बेकायदा बांधकाम करण्यात आले असून व्यावसायिकांकडून बेकायदेशीरपणे बेसुमार भाडे वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करून तातडीने अहवाल सादर करावा असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासनाला दिले.

सिटी सेंटर मॉलला 22 ऑक्टोबरला लागलेली आग 56 तासांनी विझली. त्यामुळे या आगीवरून अजूनही घमासान सुरू आहे. या आगीबाबत प्रशासनाने दोन वेळा स्थायी समितीत उत्तर दिले. मात्र सदस्यांनी यावर असमाधान व्यक्त केले. आज दिलेल्या अहवालात पालिकेने आग मॉलमधील सदोष विद्युत प्रणालीमुळे लागल्याचे स्पष्ट केले.

मात्र प्रशासनाने मॉलमधील अग्निसुरक्षेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच मॉलमध्ये शेकडो दुकाने बेकायदेशीरपणे सुरू करण्यात आली असून बेसुमार भाडे घेतल्याचे प्रकार समोर आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. त्यामुळे मॉल सुरू होताना किती दुकानांना परवानगी दिली होती, आता प्रत्यक्षात किती दुकाने आहेत याचा अहवाल सादर करावा असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

अॅट्रीया मॉलला नोटीस

पालिकेने वरळी येथील अॅट्रीया मॉलची 8 नोव्हेंबर रोजी पाहणी केली होती. त्यात अग्निप्रतिबंधक यंत्रणेत त्रुटी आढळल्या आहेत. या त्रुटी दुर करण्यासाठी अग्निप्रतिबंधक आणि जीव संरक्षक उपाययोजना 2006 नुसार नोटीस जारी करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे मॉलमधील बेकायदा बांधकाम असण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्य़ांना पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाने स्थायी समितीत सादर केली आहे.