इजिप्तमध्ये उत्खननात सापडल्या 2500 वर्षांपूर्वीच्या शेकडो ‘ममी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्राचीन पिरॅमिड्सचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱया इजिप्तमध्ये तब्बल 2500 वर्षांपूर्वीच्या 100 लाकडी शवपेटय़ा (काॅफीन्स) सापडल्या आहेत. इजिप्तच्या सरकारने शनिवारी याबाबतची घोषणा केली. काॅफीन्स लाकडापासून तयार केलेल्या विविध रंगांनी आणि अत्यंत सुंदर चित्रांनी सजविल्या आहेत. शवपेटय़ा पाहून पुरातत्व विभागही चकित झाले आहे. विशेष म्हणजे या पेटय़ांमध्ये ’ममी’ अत्यंत सुरक्षितरीत्या जतन करून ठेवल्या आहेत.

पुरातत्व विभागाच्या अधिकाऱयांच्या माहितीनुसार, शवपेटय़ा सक्कारा येथे दफन करण्यात आल्या होत्या. एकेकाळी तिथे मोठी दफनभूमी होती. या पेटय़ा पाहून अनेकांनी त्याचं व त्यावेळच्या तंत्रज्ञानाचं काैतुक केलं आहे. इजिप्तच्या पर्यटन मंत्रालयाने सांगितले की, सुरुवातीला दफन केलेले तीन खड्डे मिळाले. त्यामध्ये 13 शवपेटय़ा होत्या. यानंतर आणखी 14 शवपेटय़ा मिळाल्या. नुकतेच आणखी 100 शवपेटय़ा सापडल्या आहेत. पेटय़ा तीन ठिकाणांहून 40 फूट खोल जमिनीतून काढण्यात आल्या. हा एकप्रकारचा खजिना असून सक्कारा येथून आणखी बरेच काही सापडेल, अशी आशा पुरातन आणि पर्यटन मंत्री खालेद अल अनानी व्यक्त केली. याशिवाय 40 हून अधिक देवतांचे पुतळे तसेच मजेशीर मुखवटे सापडल्याचेही त्यांनी सांगितले.

  • शवपेटय़ा प्राचीन इजिप्तच्या प्लोटेमॅक काळात वरिष्ठ अधिकाऱयांच्या आहेत. या पेटय़ांमधून प्राचीन इजिप्तविषयी समजून घ्यायला मदत होईल.
  • पुरातत्वशास्त्रज्ञांना लवकरच ममींसाठी लाकडी शवपेटी तयार करणारी एखादी प्राचीन कार्यशाळा सापडेल अशी आशा आहे. असे पुरातन मंडळाच्या सर्वोच्च काैन्सिलचे सरचिटणीस मुस्तफा वजीरी यांनी सांगितले. येत्या काही वर्षांत इजिप्तमध्ये पुरातत्व शोध पर्यटन वेग घेईल अशी आशा आहे.