
फसवणुकीच्या गुह्यात फरार असलेल्या आरोपीला सहा वर्षांनी क्राईम ब्रँचच्या युनिट 7 ने अटक केली. शकील अहमद खान असे त्याचे नाव आहे. त्याला पुढील तपासासाठी ना. म. जोशी मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
शकील हा पूर्वी अॅण्टॉप हिल परिसरात राहत होता. तो आणि त्याचे दोन मित्र हे रस्त्यावरून जाणाऱया नागरिकाना टार्गेट करून त्यांच्याकडील सोने आणि रोख रक्कम घेऊन पळ काढत असायचे. फसवणूक केल्या प्रकरणी शकीलला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या विरोधात सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. जामिनावर येताच तो पळून गेला होता. त्याच्या विरोधात न्यायालयाने वॉरंट जारी केले होते.
गेल्या सहा वर्षांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. शकील नवी मुंबई परिसरात राहत असल्याची माहिती युनिट 7 चे उप निरीक्षक सुरेश साळुंखे याना मिळाली. त्या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकातील संजय सुर्वे, सुनिल गाडे, सुरेश साळुंखे, निधी धुमाळ, महेंद्र कालुष्टे, मुरलीधर सपकाळे यांनी तेथे सापळा रचला. सापळा रचून शकीलला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात 17 हुन अधिक गुन्हे दाखल आहेत.


























































