
हात मोडल्याने दोन महिन्यांपासून माहेरी थांबलेली बायको नांदण्यास येत नसल्याने पती रागाने बेभान झाला होता. रागाच्या भरात पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत कत्तीने तिच्या मानेवर आणि डोक्यात सपासप वार केले आणि स्वतः विषारी औषध प्राशन केले. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला.ज्ञानेश्वरी धनराज उर्फ योगीराज सोनवर (वय 27, रा. होळ, ता. केज) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना परळी तालुक्यातील बोधेगाव येथे सोमवारी दुपारी घडली.
परळी तालुक्यातील बोधेगाव येथील ज्ञानेश्वरीचा विवाह सहा वर्षांपूर्वी होळ येथील धनराज उर्फ योगीराज वनराज सोनवर याच्यासोबत झाला होता. या दांपत्याला एक मुलगी (वय 5) आणि एक मुलगा (वय 3) आहे. काही महिन्यांपूर्वी ज्ञानेश्वरी आणि धनराज संभाजीनगर येथे कामानिमित्त गेले होते. तिथे दोन महिन्यांपूर्वी पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वरीचा हात मोडला. त्यानंतर ती राहण्यासाठी माहेरी बोधेगावला तळावर येथील शेतातील घरी आली होती.
सोमवारी दुपारी धनराज बोधेगावला आला. सासरवाडीत ज्ञानेश्वरीचा भाऊ वैजनाथने धनराजसोबत जेवण केले आणि शेळ्या चारण्यासाठी निघून गेला. दुपारी 4 वाजता धनराज पुन्हा सासरवाडीच्या घरी आला. सासरी नांदण्यास का येत नाहीस असे म्हणत त्याने चारित्र्यावर संशय घेत ज्ञानेश्वरीला शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर रागाने बेभान झालेल्या धनराजने धारदार कत्तीने तीच्या गळ्यावर, मानेवर आणि डोक्यात सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वरीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मृताची बहीण कल्पना शामराव सोडगीर यांच्या तक्रारीवरून धनराज सोनवर यांच्यावर सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे करत आहेत.
पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न
बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून कल्पना यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नातेवाईक धावत आले. यावेळी धनराजने सोबत आणलेल्या बाटलीतील विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. नातेवाईकांनी अत्यवस्थ झालेल्या धनराजला उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.



























































