
कोरोनावर 95 टक्के परिणामकारक ठरणारी रशियाची स्पुटनिक व्ही ही लस हिंदुस्थानमध्ये बनवली जाणार आहे. त्यासाठी स्पुटनिक लसीच्या जगभरातील उत्पादनाचे काम पाहणाऱया रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) सोबत हेटरो लॅब लिमिटेड या औषध बनवणाऱया कंपनीने करार केला आहे. त्यानुसार वर्षाला 10 कोटी डोस बनवले जाणार आहेत.
स्पुटनिक व्ही ही लस रशियाच्या गैमेलिया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपीडिमियोलॉजी अॅण्ड मायक्रो बायोलॉजी या संस्थेने बनवली आहे. या लसीच्या तिसऱया टप्प्यातील चाचण्या बेलारूस, यूएईसह जगभरातील अनेक देशांमध्ये सुरू आहेत. तर हिंदुस्थानात दुसऱया आणि तिसऱया टप्प्यातील चाचण्या सुरू असल्याचे आरडीआयएफ ने स्पष्ट केले आहे. दरम्यान या लसीचे 120 कोटी डोस बनवण्यासाठी 50 हून अधिक देशातून आरडीआयएफकडे संपर्प साधला आहे. त्यासाठी हिंदुस्थान, चीन, ब्राझील, दक्षिण कोरिया येथे ही लस बनवली जाणार आहे. हेटरो लॅबने कोरोना लसीबाबत आरडीआयएफ सोबत केलेल्या करारामुळे आनंद झाला असल्याचे हेटरो लॅबचे संचालक मुरली कृष्णा रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच यामुळे मेक इन इंडियाला हातभार लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
25 वर्षांपासून औषध निर्मितीत
हैद्राबाद स्थित हेटरो लॅब ही हिंदुस्थानी जेनेरिक फर्मास्युटिकल कंपनी 1993 मध्ये डॉ. बी. एस. रेड्डी यांनी सुरू केली होती. एचआयव्ही, एड्सवरील औषध बनवणारी जगभरातील सर्वात मोठी कंपनी आहे. हेटरोच्या माध्यमातून हिंदुस्थानात तयार होणाऱया लसीच्या एका डोसची किंमत 700 रुपये असणार आहे.






















































