स्वागत दिवाळी अंकांचे – चंद्रकांत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘चंद्रकांत’ या दिवाळी अंकाचे यंदाचे 57 वे वर्ष आहे. या अंकाची सुरुवात विशेष व्यक्तिचित्र लेखाने होते. कृष्णाजी कुलकर्णी म्हणजेच केबी यांच्या जीवनावर आधारित गूढ यात्रेचा वारकरी हा लेख यशोधरा काटकर यांनी लिहिला आहे. याबरोबरच यंदाच्या चंद्रकांत अंकात पाच कादंबऱयांची साहित्यिक मेजवानी चाखता येणार आहे. यामध्ये पु. रा. रामदासी यांची जादुगार सायमन, उमेश कदम लिखित योद्धा, डॉ. उर्जिता कुलकर्णी यांची दोन घरं पुढे, मुकुंद वझे यांची ब्राह्मणांची बंधमुक्ती, सागर कुलकर्णी यांची काकामामाच्या कर्म सोहळ्याची कहाणी या संपूर्ण कादंबऱया वाचता येतील. याबरोबरच साहसी प्रवास वर्णन लेख विभागात इंका पायवाटेवरून गूढरम्य माचुपिचू नगरीकडे हा गिरीश देसाईंचा लेख वाचनीय आहे. पुस्तक परिचय विभागात तिला घरी जायचं होत हा शैलेंद्र शिर्के याचा लेखही विशेष लक्षवेधी ठरत आहे. एकूणच पाच कादंबऱया आणि इतर साहित्यांचा आनंद देणारा हा ‘चंद्रकांत’चा दिवाळी अंक आहे.

संपादक – राजेंद्र कुलकर्णी, मूल्य 250 रुपये.

धनंजय

डिटेक्टिव्ह आणि गूढ कथाकारांना वाहिलेला ‘धनंजय’ हा दिवाळी अंक यंदा हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या वर्षाचे महत्त्व लक्षात घेता अंकाची सुरुवात गूढ कथाकार रत्नाकर मतकर यांच्या जीवनावर आधारित रत्नांच्या खाणीत या गिरीश देसाईंच्या लेखाने झाली आहे. याबरोबरच स्मरण विभागात यशवंत रांजणकर, कमल शेडगे, प्रभाकर नाईकसाटम यांना आदरांजली देण्यात आली आहे. हॅलो… मी धनंजय हा अरुण नेरुरकर लिखित लेख विशेष लक्षवेधी आहे. खेळ बुद्धीचा ही चातुर्य कथा, दरवाजा ही दीर्घकथा, पन्नास वर्षे मौनाची हा वासंती फडके यांचा लेख, बिऍट्रीस आणि पितृहत्या, नथिंग न्यू अंडर दी सन वाचनीय आहेत. भय गूढ कथांमध्ये शेवंता इथेच राहते, झोपेत जागलो मी, कोळेश्वर, लिकथा, पुरावा, खेळ, मी विज्ञानाची विद्यार्थी, सावट, प्रामो, पोट्रेट, म्हाताऱयाची गोष्ट, जळू नको पाळू या कथा वाचकांना खिळवून ठेवतात. याबरोबर अनुवादित कथा, साहस कथा, दहशत कथा, विज्ञान कथा तितक्याच उल्लेखनीय आहेत.

संपादक – नीलिमा कुलकर्णी, मूल्य 300 रुपये.