दुसऱयांच्या पक्षात जाण्यापेक्षा माझा पक्ष वाढवेन, जयंत पाटील यांचे ट्विट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुसऱयांच्या पक्षात जाण्यापेक्षा मी माझा पक्ष वाढवेन, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज केले. महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली नसती तर जयंत पाटील हे भाजपात येणार होते असे वक्तव्य काँग्रेसचे नारायण राणे यांनी आज रत्नागिरीत केले. त्या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले, सत्ता माझ्यासाठी गौण आहे. दुसऱयांच्या पक्षात जाण्यापेक्षा मी माझा पक्ष वाढवेन. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने बेछूट आरोप आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये केली जात आहेत. राणे यांनी आज असेच वक्तव्य केले आणि जयंत पाटलांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.

काय म्हणाले जयंत पाटील…
जयंत पाटील यांची भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत बोलणी झाली होती, असे राणे म्हणाले. त्यावर ‘राणे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांत मोडत नाहीत, हे समजून खेद वाटला’ असा चिमटा काढतानाच ‘भाजपच्या कोणत्या नेत्यासोबत माझी बोलणी झाली हे नारायण राणे यांनी जाहीर करावेच, असे आव्हान त्यांनी दिले. मी पवार साहेबांचा कार्यकर्ता असल्याने असा विचार माझ्या मनात कधी आलाच नाही. त्यामुळेच मागील पाच वर्षे मी सरकार विरोधात विधिमंडळात लढत होतो. दुसऱयांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे, असा टोला लगावतानाच आलेली सत्ता जाते व ती पुन्हा मिळवता येते ही पवार साहेबांची शिकवण आहे. त्यामुळे सत्ता हा विषय माझ्यासाठी गौण असल्याचे जयंत पाटील म्हणाले.