जलसाठे जपताना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिलीप जोशी, [email protected]

आपल्याकडे आताच्या काळात येणाऱया स्थलांतरित पक्ष्यांविषयी गेल्या वेळच्या लेखात थोडक्यात माहिती घेतली. निसर्गाशी आपली जीवनपद्धती जुळवून घेत पक्षीगण कसे राहतात याचा अभ्यास डॉ. सलीम अलींपासून पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली यांच्यासारख्या अभ्यासकांनी सखोलपणे केला आणि जनसामान्यांना त्याबाबत जागरूकही केले. त्यामुळे गेल्या तिसेक वर्षांत निसर्ग आणि पर्यावरणप्रेमींची संख्या वाढली.

निसर्गावर मात नव्हे, तर निसर्गाला साथ देतच यापुढच्या काळात प्रगतीची पावले टाकावी लागतील याची जाणीव जगातल्या सत्ताधिशांनाही हळूहळू का होईना होतेय ही एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल. पर्यावरणस्नेही कार्यक्रम जगातील अनेक संस्था आणि व्यक्तीही हाती घेत असतात. कोणी एकांडा शिलेदार हिमालयात झालेला कचरा दूर करण्याचं व्रत घेतो आणि अनेक संस्थाही सामूहिकरीत्या असेच प्रयत्न करत असतात.

आपल्या पृथ्वीवर जतन करून ठेवावी अशी कितीतरी नैसर्गिक ठिकाणं आहेत. पृथ्वीवरचे नद्यांसारखे जलसाठे ठिकठिकाणी प्रदूषित झालेत ते स्वच्छ करण्याचं कामही सुरू आहे. युनोच्या ‘युनेस्को’सारखी संस्था हिमालयातील पैलासासारख्या पर्वतराजीला जागतिक ‘हेरिटेज’ स्थळ म्हणून मान्यता देतेय आणि आपल्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पाणथळ जागांपैकी नाशिकच्या नांदुर-मधमेश्वरनंतर आता लोणार येथील अशनीआघातजन्य विवर सरोवरालाही ‘रामसर’ दर्जा लाभला आहे.

इराणमधील रामसर येथे जगातील पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी (वेट अॅण्ड कन्झर्वेशन) 2 फेब्रुवारी 1971 रोजी एका परिषदेत विचारमंथन झाले आणि 21 डिसेंबर 1975 पासून त्यातील निष्कर्षांची अंमलबजावणी सुरू झाली. या प्रकारच्या पाणथळ जागांमध्ये समुद्रकिनारी असलेली मॅनग्रोज किंवा कांदळवने, लाल रंगाचं पोळं (कोरल) निर्माण करणाऱया पाणथळ जागा, निसर्गनिर्मिती ज्वालामुखीजन्य अथवा आपल्याकडच्या लोणारसारखी, अवकाशातून अशनी कोसळून आकाराला आलेली विवरं आणि त्यातील जलसाठा अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो.

जगात ब्राझील, फ्रान्स, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया यांसारख्या देशांमधल्या वेटलॅण्डच्या संवर्धनासाठी यापूर्वीच प्रयत्न सुरू झाले आहेत. ‘रामसर’ परिषदेतील तत्त्वांनुसार जाहीर झालेल्या वेटलॅण्डमध्ये हिंदुस्थानातील बंगाली वाघांसाठी प्रसिद्ध असलेलं हुगळी नदीमधलं प्रसिद्ध सुंदरबन, आंध्रातील कोल्नेह येथील वेस्टलॅण्ड, आसाममधील दीपोरच्या पाणथळ जागा, गुजरातमधील प्रसिद्ध जलसरोवर पक्षी अभयारण्य आणि हिमाचल प्रदेशातील चंदेरतल या जागांची निवड पूर्वीच झाली होती. 2020च्या आरंभी 29 जानेवारीला नाशिकजवळच्या नांदुर-मधमेश्वर पक्षी अभयारण्याचा त्यात समावेश झाला आणि आता 13 नोव्हेंबरला लोणारही अशा संबंधित क्षेत्रात येणार आहे.

या दोन्ही ठिकाणी जाण्याचा योग आला. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी एक रात्र आम्ही नांदुर-मधमेश्वर अभयारण्यात घालवली. पहाटेपासून धुक्यात दडलेल्या पाणथळ जागेवरचे विविध स्थलांतरित पक्षी न्याहाळले आणि खूप पह्टोही घेतले. आतासारखी डिजिटल फोटोग्राफी तेव्हा नसल्याने फोटो तसे मर्यादित संख्येनेच घेता आले, परंतु लोणार येथे मात्र ते अशनी आघातजन्य विवर असल्याने आम्ही खगोल अभ्यासक 1982 पासून तिथे अनेकदा गेलो. बुगदाणे सरांच्या मार्गदर्शनातून लोणार सरोवराची माहिती मिळाली. त्यासंबंधीचा वैज्ञानिक अहवाल आमच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासला. लोणारचा एक विस्तृत माहितीपटही 1993मध्ये तयार केला. त्याविषयी कितीतरी स्लाइड शो केले. आमच्या ‘खगोल वार्ता’चा खास अंक प्रसिद्ध केला. तेव्हापासून ‘लोणार’चे पर्यावरणस्नेही जतन व्हावे, असा आग्रह खगोल मंडळाने धरला. या लेखातील नांदुर-मधमेश्वरचा फोटो मिलिंद बाबर यांनी घेतला आहे.

आता याबाबत जागरुकता वाढत असून रामसर वेटलॅण्डमध्ये या सरोवराचा समावेश होणे ही स्वागतार्ह गोष्ट म्हणावी लागेल. अग्निजन्य (बेसॉस्टिक) खडकात तयार झालेले पृथ्वीवरचे ज्ञात असे हे अशनीआघाती विवर आपल्या महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हय़ात आहे हा आपल्या दृष्टीने जागतिक महत्त्वाचा ठेवा आहे. खाऱया पाण्याचे हे विशाल सरोवर हिरव्यागार वनश्रीने भरलेले दिसते. त्याला प्रदूषणाचं ग्रहण लागू नये यासाठी सरकारही प्रयत्न करेल, असा विश्वास वाटतो. या सरोवरात जाण्यासाठी विवरात खोल उतरावं लागतं. पाणी फार खोल नाही आणि त्यातली आम्हाला त्यात अॅल्जी पिंवा शेवाळंवगळता इतर जलचर (मरीन लाइफ) आढळले नव्हते, परंतु सभोवती सुंदर वनश्री आहे. अमेरिकेतले ऑरिझोनाहो येथील ‘बॅरिंजर व्रेटर’ शुष्क आहे तरी ते त्यांनी असे जपलेय की, जगभराचे पर्यटक तिकडे येतात. आता आपल्या राज्यातल्या रामसर दर्जा लाभलेल्या ‘वेटलॅण्ड’ जागा सांभाळणं सर्वांचं काम आहे. त्यात जनसामान्यांची पर्यावरणविषयक जाणीवही महत्त्वाची.