
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे एपीएमसी संदर्भातील ते पत्र 165 पानांचे असून त्यातील दोनच पाने दाखवून भाजपकडून दिशाभूल केली जात आहे. शरद पवार यांनी त्यावेळी सर्वसमावेशक आणि व्यापक अशा एपीएमसी अॅक्टसाठी राज्यांना सूट दिली होती, मात्र भाजप हा शेतकऱयांचा पक्ष नसून शेतकऱयांच्या मालाची लूट करणारा पक्ष आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाला पाठिंबा देताच भाजपने शरद पवार हे कृषीमंत्री असतानाचे एक पत्र व्हायरल केले आहे. यावर बोलताना नवाब मलिक म्हणाले, शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी कोणताही निर्णय एकटय़ाने घेतला नव्हता. निर्णय घेत असताना त्यांनी राज्याचे म्हणणे ऐकून घेतले तसेच केंद्राचा कायदा सरसकट न लादता राज्यांनाही त्यांच्या पद्धतीने बदल करण्याचे अधिकार दिले. मोदी सरकारने आणलेल्या नव्या कायद्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांना निष्प्रभ केले आहे. तसेच हमीभावाबद्दल कोणतेही आश्वासन दिलेले नाही. शेतकऱयांनी आंदोलन सुरू केल्यानंतर मोदी सरकार हमीभाव कायद्यात अंतर्भूत असल्याचा शब्द देत आहे. मात्र सरकार हे शब्दांनी नाही तर कायद्याने चालते, त्यामुळे कायद्यात हमीभावाचे आश्वासन असायला पाहिजे होते, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
ते पत्र सूचक, निर्देश नव्हते
पवार यांनी राज्यांना लिहिलेले पत्र हे सूचक होते, ते निर्देश नव्हते. एपीएमसीचे अधिकार केंद्राकडे घेण्यास शरद पवार कधीही तयार नव्हते मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांमध्ये राज्यांना आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोणतेही अधिकार देण्यात आलेले नाहीत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले, अशी माहितीही नवाब मलिक यांनी दिली.






























































