भाजी खरेदी करतानाच लांबवला मोबाईल, चोराची धुलाई झाल्यावर मिळाले 14 हँडसेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mobile

पेठफाटा बाजार परिसरात गेल्या काही दिवसांत अनेक मोबाईल चोरीला गेल्याच्या घटना घडत होत्या. भाजी खरेदी करण्याच्या बहाण्याने इतर ग्राहकांचे फोन लांबवणाऱ्या या भामट्याला पकडण्यात पंचवटी पोलीसांना यश आले असून या चोराची धुलाई केल्यावर त्याच्याकडून एक दोन नाही तर तब्बल 14 मोबाईल हँडसेट मिळाले आहे.

पेठफाटा परिसरात रविवारी संध्याकाळी तरुणीच्या बॅगमधून एकाने मोबाईल चोरला. तिने आरडाओरडा केला, त्याचवेळी पंचवटीतील गुन्हे शोध पथकातील गस्तीवरील हवालदार मलंग गुंजाळ, शिपाई संदीप गाडे, घनश्याम महाले, तसेच आपले काम संपवून निघालेले मुख्यालयातील पोलीस नाईक दयाराम डांगे, प्रशिक्षणार्थी आदित्य आव्हाड, विक्रम दळवी यांनी पाठलाग करून चोराला ताब्यात घेतले.

फुलेनगर येथील अनिल संजय पवार (वय -20) असे त्याचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार यांनी चौकशी केली असता त्याने पंचवटीतील भाजी मार्केटमधून एकाचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्या मोबाईल मालकाच्या फिर्यादीवरून पवारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली. त्याच्याजवळून 93 हजार रुपये किंमतीचे 14 मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत.