जिल्हा परिषदेतून हरवलेला सव्वा कोटींचा चेक दीड वर्षांनंतर दाराला टांगलेला सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा कहर पहायला मिळाला आहे. दीड वर्षांपुर्वी सव्वा कोटी रुपयांचा विकासकामांचा धनादेश गहाळ झाल्याचा प्रकार घडला होता. आता दी़ड वर्षानंतर या गायब झालेल्या चेकला अचानक पाय फुटले आणि हा धनादेश मुख्य लेखा आणि वित्त अधिकाऱ्यांच्या दालनातील दरवाज्याला लटकलेला आढळला. सुरुवातीला धनादेश गायब करायचा आणि बोंबाबोंब झाल्यावर तोच धनादेश दालनाच्या दरवाज्याला अडकवण्याचा प्रताप जिल्हापरिषदेत घडला आहे. हा धनादेश कोणी अडकवून ठेवला याचा शोध सुरु आहे. इतक्या मोठ्या निधीचा धनादेश गायब होणे आणि मग तो दरवाज्याला लटकलेला सापडणे या प्रकारामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.

तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सरोवर संवर्धनासाठी निधी मंजूर केला होता. त्यातून खेड तालुक्यातील सवेणी आणि घेरा पालगड या दोन तलावांचे नुतनीकरण आणि सुशोभिकरण होणार होते. सवेणीसाठी 1 कोटी 25 लाख आणि घेरा पालगडसाठी 12 लाख 82 हजार रुपये मंजूर झाले़. हा धनादेश खेड पंचायत समितीकडून जून 2019 ला रत्नागिरी जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आले. हा धनादेश सामान्य प्रशासनाकडे गेला होता. मात्र त्यानंतर सव्वा कोटी रुपयांचा हा धनादेश गहाळ झाला होता. धनादेश गायब होण्याची माहिती उघड होताच अनेकांचे धाबे दणाणले होते.

धनादेश कुणी दाराला लटकवला ? हे सीसीटिव्हीच सांगतील!

हा धनादेश गायब झाला नसून जिल्ह्याच्या विकास कामात अडथळा आणण्यासाठी मुद्दाम गळाळ केल्याची चर्चा आहे़. अचानक दीड वर्ष गायब असलेला धनादेश अचानक दरवाजाच्या कडीला लटकताना दिसला. दीड वर्षानंतर या धनादेशाची वैधताही संपली आहे. तरीही हा चेक दारावर कोण लावून गेला हे जिल्हा परिषदेतील सीसीटिव्हीच सांगू शकतात़. सीसीटिव्ही तपासले गेल्यास धनादेशाला दरवाज्यापर्यंत पोहोचवणारे महाशय सापडू शकतात़. तसेच धनादेश आल्यापासून त्याच्या आवक नोंदी आणि पुढील कार्यवाही तपासल्यास हा हलगर्जीपणा कोणाचा आहे हे ही आढळून येऊ शकते़.

बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करा-अरूण कदम

जिल्हा परिषद सदस्य अरूण कदम यांनी या कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणाबाबत संताप व्यक्त केला आहे़. 2019 ला निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा धनादेश गायब होण्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे़. हा धनादेश गायब करणारा आणि लपवलेला धनादेश पुन्हा आणणाऱ्यांची पाळेमुळे आम्ही खणून काढणार आहे. हा धनादेश ताब्यात घेतल्यापासून दीड वर्षानंतर हा धनादेश पुन्हा आणून दाराला धनादेश लटकवून ठेवणाऱ्याला आम्ही शोधून काढू़ असे अरूण कदम यांनी सांगितले.शिवसेनेचे दापोलीचे आमदार योगेश कदम यांनीही या प्रकाराकडे गांभिर्याने लक्ष दिले आहे़.