
शक्ती विधेयक विधिमंडळाच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याचा निर्णय आज एकमताने घेण्यात आला. या विधेयकाचा अभ्यास करण्यासाठी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली 21 आमदारांची समिती नेमण्यात आल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
महिला व बालकांवरील अत्याचाराच्या विरोधातील शक्ती विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आले. या विधेयकावर चर्चा झाली नाही. त्यावर गृह मंत्री अनिल देशमुख म्हणाले की, हे अतिशय महत्त्वाचे विधेयक आहे. यावर घाईघाईने निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे यावर विचारविनिमय करण्यासाठी 21 सदस्यांच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात येत आहे. त्यावर विधिमंडळाच्या पुढील अधिवेशनापूर्वी विधेयकाचा अहवाल सादर करावा, असे आदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
शक्ती विधेयकासाठी संयुक्त समिती सदस्यांची निवड
महिला अत्याचार प्रतिबंधासाठी आणि अशा प्रकारच्या गुन्हय़ात एक महिन्याच्या कालावधीत जलद न्याय मिळावा, यासाठी बनवण्यात येत असलेल्या शक्ती विधेयकासाठी आज दोन्ही सभागृहांतील संयुक्त समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. या संयुक्त समितीत दोन्ही सभागृहांचे 31 सदस्य असणार आहेत. यात विधान परिषदेचे अनिल परब, शशिकांत शिंदे, भाई जगताप, भाई गिरकर, विनायक मेटे, अमोल मिटकरी, कपिल पाटील हे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले.




























































