
दिवाळीसाठी रजा व बोनस मागितला म्हणून एका कॅन्टीन मालकाने त्याच्या नोकराची हत्या केल्याचे समोर आले आहे. या निष्ठूर मालकाने नोकराला लोखंडी रॉडने मारहाण करत नंतर सुऱ्याने भोसकले आहे. दिवाळी दरम्यान राजस्थानमध्ये घडलेल्या या हत्ये प्रकरणी मुंबई पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
बोनस मागितला म्हणून आला राग
आरोपी वरूण व्यास हा त्याच्या एसयूव्हीमधून पळून जात असताना दहिसर चेकनाक्याजवळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. वरूणचे राजस्थानमधील चित्तोढगढ येथे एक कॅन्टीन आहे. या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या करण मेहेर या नोकराने 15 नोव्हेंबर रोजी वरूणकडे दिवाळीचा बोनस व सुट्टी मागितली होती. त्यावरून वरुणचा पार चढला व त्याने करणला लोखंडी रॉडने मारहाण केली. तो एवढ्यावरच थांबला नाही त्याने करणला सुऱ्याने भोसकले. त्यानंतर कॅन्टीनमधील इतर कर्मचाऱ्यांनी करणला रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान त्याचा 20 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. या दरम्यान वरूण तेथून फरार झाला व मुंबईला आला. याबाबत राजस्थान पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांना अलर्ट केले. पोलीस गेले काही दिवस त्याच्या मागावर होते. अखेर मंगळवारी दहिसर चेकनाक्यावर उभ्या असलेल्या एका एसयूव्हीमधून पोलिसांनी वरुणला अटक केली.
मुंबईतही दाखल आहेत गुन्हे
वरूणवर याआधीही मुंबईत चोरीचे व फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. वरुण व्यास हा 20 वर्षांपूर्वी मुंबईत बॉलिवूडमध्ये त्याचे नशीब आजमवायला आला होता. मात्र त्यावेळी त्याला बॉलिवूडमध्ये संधी मिळाली नाही. त्यानंतर त्याने काही जणांची फसवणूक केली होती. याप्रकरणी 2001 व 2004 मध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच रायगडमध्येही त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल आहे.





























































