
वाहन चालविताना ड्रायव्हरला काय सुचेल याचा काय नेम नाही. रस्त्याच्या कडेने चाललेल्या शेळ्यांना पाहून एका पिकअप चालकाने विनाकारण जोराने हॉर्न वाजविला. त्यामुळे शेळ्या घाबरून पळू लागल्या. त्याचा जाब विचारण्यासाठी दाम्पत्याला तिघाजणांनी बेदम मारहाण केल्याची घटना पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गावात घडली आहे.
याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी अनिल नारायण गायकवाड, नारायण रघुनाथ गायकवाड आणि माणिक रघुनाथ गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्वाती राजेंद्र शिंदे (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे.
स्वाती आणि राजेंद्र यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे. सोमवारी शिंदे दाम्पत्य शेळ्या चरण्यासाठी घेऊन जात होते. त्यावेळी नारायण दोघा साथीदारांसह पिकअप गाडीतून जात होते. त्यावेळी त्यांनी रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या शेळ्यांना पाहून मुद्दाम जोरात हॉर्न वाजवला. त्यामुळे शेळ्या घाबरून पळू लागल्या. त्याचा जाब विचारण्यासाठी स्वाती आरोपींकडे गेल्या. त्यावेळी तिघांनी त्यांना शिवीगाळ केली. स्वाती यांचे पती राजेंद्र भांडण सोडविण्यासाठी गेले असता अनिल, नारायण, माणिकने त्यांना काठीने आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महाडिक तपास करीत आहेत.






























































