दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; 100 कांद्याच्या गोण्या चोरल्याची कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार अट्टल दरोडेखोरांना श्रीरामपूरमधील कोल्हार गुहा परिसरात पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अंधाराचा फायदा घेत पळुन गेलेल्या तीन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पकडलेल्या दरोडेखोरांवर कल्याण, शहापूर, टेकावडे, लोणी, राहुरी, राहाता, श्रीरामपूर आदी ठिकाणी दरोडा, लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. दरोडेखोरांनी 95 हजार रूपयांच्या 100 कांद्याच्या गोण्या चोरल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे.

गुहा कोल्हार परीसरात संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या लोकांची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहचले असता, 5 ते 7 जण अशोक लेलॅण्ड पिकअपच्या आडोशाला उभे राहुन रस्त्यावरील वाहनांना थांबण्याचा प्रयत्न करताना दिसले.

गणेश बाळासाहेब शेंडगे, (वय 21, रा. चिंचोली फाटा, ता. राहुरी), किरण उर्फ विकी बबन थोरात( वय 25, रा. चिंचोली फाटा, ता. राहुरी), आकाश बाबासाहेब वाकडे ( वय 22 , रा. गुहापाट, ता. राहुरी), नवनाथ नंदकुमार पाचारणे (वय 20, रा.डिग्रस, ता. राहुरी ) या चौघांना पोलिसांनी शिताफीने पकडले. त्यांच्याकडे असलेली अशोक लिलॅण्ड कंपनीची मालवाहतूक गाडी तसेच दरोडा घालण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले. अभी अशोक जाधव (रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी), प्रकाश भोसले (रा. चिंचोली फाटा, ता. राहुरी) आणि एक अल्पवयीन मुलगा हे तिघे अंधाराचा फायदा घेत पळून गेले. पोलिसांनी दरोडेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी 2 नोव्हेंबर रोजी पहाटे चिंचोली फाटा(ता. राहुरी) येथील योगेश मिठुलाल मुथा (वय 38, रा. कोल्हार बुद्रुक, ता. राहाता) यांच्या कांद्याच्या शेडची जाळी कापुन 95 हजार रूपये किंमतीच्या कांद्याच्या गोण्या चोरल्याची कबुली दिली. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे अधिक तपास करीत आहे.