कांदा पिकांचे नुकसान व्हावे म्हणून जादूटोण्याचा प्रकार, तणनाशकही फवारले; जुन्नरच्या कांदळीतील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वृद्ध शेतकरी महिलेच्या शेतातील कांदा पिकाचे नुकसान व्हावे म्हणून तिच्या शेतात कापलेली लिंबं, बनावट मंगळसूत्र, नारळ, अंडी ठेवून काळ्या बाहुलीची पूजा करून जादूटोण्याचा प्रकार जुन्नर तालुक्यातील कांदळी येथे उघडकीस आला. तसेच कांदा पिकावर तणनाशक फवारणी देखील करण्यात आली. ही घटना 9 डिसेंबर ते 14 डिसेंबर या दरम्यान घडल्याचे संबंधित वृद्ध महिलेकडून सांगण्यात येते.

हिराबाई हरिभाऊ फुलवडे (वय 65, रा. कांदळी, ता. जुन्नर) यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी याबाबत माहिती दिली.

जुन्नर तालुक्यात यापूर्वी द्राक्ष व डािंळबाच्या बागेतील झाडे छाटून शेतकऱ्यांचे नुकसान केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यातच कांदा व बटाटा चोरीच्या घटनादेखील वाढल्या आहेत. मात्र आता जादूटोण्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कांदळी येथील हिराबाई फुलवडे यांनी शेतात कांद्याची लागवड केली आहे. कांदा रोपे चांगली उगवली आहेत. मात्र 9 डिसेंबर ते 14 डिसेंबर या दरम्यान त्यांच्या कांदा पिकात कोणीतरी कापलेली लिंबं, बनावट मंगळसूत्र, नारळ, अंडी ठेवून काळ्या बाहुलीची पूजा करून जादूटोणा केला. तसेच कांदा पिकावर तणनाशक फवारणी देखील केली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून अशा माथेफिरुंवर कारवाई होईल का, असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.