
कोरोनावरील लस आल्यानंतर गेल्या आठवड्याभरापासून तेजीत असलेला शेअर बाजार सोमवारी चांगलाच गडगडला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात दुपारी 12 वाजेनंतर मोठ्या घसरणीला सुरुवात झाली. बाजाराचा निर्देशांक सुमारे 2037 अंकांनी घसरला आहे. तर निफ्टीतही 392 अंकांची मोठी घसरण झाली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हायरसच्या भीतीमुळे बाजाराला मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या या व्हायरसचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असून ब्रिटनमध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या व्हायरसच्या फैलावामुळे जागतिक मंदी येण्याची शक्यता असल्याने अनेकांनी बाजारातून पैसा काढून घेतल्याने बाजार कोसळला आहे.
गेल्या सहा दिवसांपासून तेजीत असलेला शेअर बाजार सोमवारी कोसळला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 44,923 वर आला होता. तर निफ्टी 13,131 वर आला होता. सोमवारी सर्वच सेक्टरला लाल निशाण आले आहे. म्हणजेच सर्व सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. ऑटो आणि मेटल क्षेत्राला सर्वात मोठा फटका बसला आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचे आलेले नवे स्वरुपामुळे बाजारात सोमवारी मोठी घसरण दिसून आली. बाजाराला सुरुवात झाल्यानंतर निर्देशांक 267 अंकांनी खाली येत 46,693 वर आला होता. तर निफ्टीत 86 अकांची घसरण होत तो 13,674 वर आला होता. त्यानंतर 10 वाजेनंतर बाजार स्थिर होत असतानाच 12 वाजेनंतर मोठ्या घसरणाली सुरुवात झाली.
ओएनजीसी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, इड्यूसइंड बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया या शेअरमध्ये 3 ते 5 टक्क्यांची घसरण दिसून आली. निफ्टीची सुरुवात 13,741.90 अंकांनी झाली होती. निर्देशांकाने 13,777.50 अंकांचा दिवसातील उच्चांक नोंदवला. त्यानंतर बाजाराची घसरण झाली आणि निर्देशांक 13,131.45 पर्यंत खाली आला होता. ओएनजीसी, टाटा मोटर्स, गेल, हिंडाल्को, हिंदुस्थान यनिलिव्हर, एशियन पेंट, एसबीआय लाईफ, सिप्ला या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. तर एकाही कंपनीचा शेअर तेजीत नव्हता. सर्व सेक्टर मंदीत आले आहेत.
मुंबई शेअर बाजार शुक्रवारी 46,960 अंकांवर बंद झाला होता. सोमवारी बाजाराची सुरुवात 46,932.18 अंकावर झाली. बाजाराने दिवसभरात 47,055.69 अकांचा उच्चांक नोंदवला त्यानंतर बाजारात घसरण झाल्याने निर्देशांकात सुमारे 1600 अंकांची घसरण होत बाजाराचा निर्देशांक 44,923.08 वर आला होता. ब्रिटनमधील कोरोनाचे नवे स्वरुप, लागू करण्यात आलेला लॉकडाऊन, अनेक देशांनी ब्रिटनच्या स्थगित केलेल्या विमानसेवा, युरोपमध्ये कोरोनाचा वाढत असलेल्या प्रकोप या वातावरणाने गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरल्याने अनेकांनी बाजारातील पैसे काढून घेण्यास सुरुवात केल्याने बाजाराची घसरण झाली आहे.


























































