
फेसबुकच्या मालकीचे लोकप्रिय मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. व्हॉट्सअॅपने आपल्या सर्व्हिसेस आणि प्रायव्हसी पॉलिसीमध्ये नवीन बदल केले आहेत. मंगळवारपासून याचे नोटिफिकेशन युजर्सला पाठवायला सुरूवात झाली आहे. ही पॉलिसी स्विकारण्यासाठी युजर्सना 8 फेब्रुवारीची डेडलाईन देण्यात आली असून ही पॉलिसी अॅक्सेप्ट न केल्यास युजर्सचे अकाऊंट डिलीट होणार आहे.
गेल्याच महिन्यात व्हॉट्सअॅपबाबतचे सर्व अपडेट ट्रक करणाऱया डब्ल्यूएबेटाइन्फोने या पॉलिसीबाबत कल्पना दिली होती. युजर्सना आपले व्हॉट्सअॅप अकाऊंट सुरू ठेवायचे असेल तर नवीन पॉलिसी स्विकारणे बंधनकारक आहे. पॉलिसी न स्विकारल्यास युजर्सना व्हॉट्सअॅप अकाऊंटचा अॅक्सेस मिळणार नाही.
काय आहे नवीन पॉलिसी
- नव्या पॉलिसीत युजर्सला लायसन्स देण्यात येणार आहे. त्यानुसार व्हॉट्सअॅपच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी या अॅपवर जी माहिती अपलोड, सबमिट, स्टोअर केली जाते किंवा मिळवली जाते, ती पुन्हा वापरात आणण्यासाठी जगभरात नॉन एक्सक्लुझीव्ह, रॉयल्टी फ्री, सब्लिसेंसेबल आणि ट्रान्सफरेबल परवाना दिला जाणार आहे.
- फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे इंटिग्रेशन जास्त असेल. त्यामुळे युजर्सचा आधीपेक्षा जास्त डेटा फेसबुककडे जाणार आहे. याआधीही व्हॉट्सअॅपचा डेटा आधीपासूनच फेसबुकला दिला जातो. व्हॉट्सअॅप ऑपरेट करण्यासाठी आणि कस्टमर सपोर्ट वाढवण्यासाठी युजर्सकडून काही माहिती कलेक्ट करू शकतो.तसेच बिझनेस अकाऊंटद्वारे होणाऱया देवाणघेवाणीची सुद्धा नोंद ठेऊ शकतो.
तूर्तास ’नॉट नाऊ’चा पर्याय !
सध्यातरी या पॉलिसीचे नोटिफिकेशन आल्यावर युजर्सना नॉट नाऊचा पर्याय दिसत आहे. त्यामुळे थोडय़ा कालावधीसाठी पॉलिसी स्विकारायची नसल्यास युजर्स ’नॉट नाऊ’ चा पर्याय निवडू शकतात. मात्र 8 फेब्रुवारीनंतर हे ऑप्शन दिसेल की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सध्या हिंदुस्थानात व्हॉट्सअॅपचे 400 मिलीयन युजर्स आहेत.

























































