
गुन्ह्यांची माहिती लपवल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. मात्र आपल्याविरोधातील हे राजकीय षड्यंत्र आहे, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
विजय वडेट्टीवार यांनी पासपोर्ट अर्जात गुह्यांची माहिती लपवल्याचा दावा करणारी याचिका भाजपचे माजी विधान परिषद सदस्य मितेश भांगडिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती.
वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये पासपोर्टसाठी अर्ज करताना त्यांच्याविरुध्द असलेल्या प्रलंबित गुन्ह्यांची माहिती नमूद केली नाही, असे भांगडिया यांनी याचिकेत नमूद केले होते.
यावर स्पष्टीकरण देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, माझ्यावर कोणत्याही गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल नाही. दाखल झालेले चार गुन्हे ते किरकोळ राजकीय स्वरूपाचे गुन्हे आहेत. हे माझ्या विरोधातील राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला.


























































