भंडारा दुर्घटनेतील दोषींना सोडणार नाही, कुणाचीही गय केली जाणार नाही! मुख्यमंत्र्यांची ठाम ग्वाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून कोणालाही मुद्दाम आरोपी करणार नाही, पण दुर्लक्ष करणाऱयांना सोडणार नाही अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. भंडारा रुग्णालयात घडलेली घटना यापुढे राज्यात कुठेही घडणार नाही. तसेच यंत्रणेच्या अनास्थेमुळे एकाही निष्पाप जिवाचा बळी जाता कामा नये, असे मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला बजावले.

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील आग लागलेल्या शिशू केअर युनिटची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या घटनेमधून वाचविण्यात आलेल्या सात बालकांवर सुरू असलेल्या उपचाराची माहिती घेतली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधला.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, परिवहन मंत्री अनिल परब, पालकमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यावेळी उपस्थित होते.

शिशू केअर युनिटला आग लागल्याची माहिती कळताच फायर एक्स्टिंग्विशद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न करणारे सुरक्षा रक्षक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीसंदर्भात संपूर्ण घटनाक्रमाची माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याकडून घेतली. संपूर्ण घटनेची चौकशी करण्याच्या दृष्टीने न्यायवैधक तज्ञांची टिम, इलेक्ट्रिकल निरीक्षक, व्हीएनआयटी, राष्ट्रीय अग्निशमन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तज्ञ, विद्युत, सार्वजनिक बांधकाम आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यांचा अहवाल लवकरच मिळणार आहे.

सर्व रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट सक्तीचे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, भंडारा येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून तिच्या कारणांचा शोध घेण्यात येईल. राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट सक्तीचे करण्यात येणार असून यंत्रसामुग्री घेण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल. या घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ञ व्यक्तींची मदत घेण्यात येणार आहे. ही घटना कुणाच्या दुर्लक्षामुळे घडली तसेच भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी व्यवस्थेत असलेल्या उणिवा व त्रुटींची सर्वंकष चौकशी करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी

जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. या समितीमध्ये तज्ञ म्हणून मुंबई अग्निशमन विभागाचे माजी प्रमुख पी. एस. रहांगदले यांचा समावेश राहणार आहे. त्यासोबतच आरोग्य सेवा संचालक व इतर विभागांच्या तज्ञांचाही या समितीमध्ये समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. या समितीला आपला अहवाल तत्काळ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या समितीच्या अहवालानुसार आगीचे नेमके कारण शोधल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. राज्यातील इतर रुग्णालयांतही या समितीने सुचविलेल्या सूचना लागू करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय