
मराठा आरक्षणाला मिळाले स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून उद्या यासंदर्भात नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात वकीलांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नवी दिल्लीत बैठक होणार आहे.
नवीन महाराष्ट्र सदनात होणाऱ्य़ा बैठकीला उपसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, अनिल परब यांच्यासह राज्य सरकारने नेमलेले वरिष्ठ विधीज्ञ, शासकीय तसेच खासगी याचिकाकर्त्यांचे वकील उपस्थित राहणार आहेत. मराठा समाज आणि शासकीय वकिलांमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या पाच खासगी वकिलांच्या समितीचे सदस्यदेखील या बैठकीत ऑनलाइन सहभागी होणार आहेत. मराठा आरक्षणाबाबत येत्या 25 जानेवारीपासून दैनंदिन स्तरावर नियमित सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत जाहीर केले होते.




























































