
महाराष्ट्रात कोंबड्या खाणाऱयांची संख्या मोठी आहे. मटणाचा भाव सर्वांनाच परवडत नसल्याने चिकन खाणारे अधिक आहेत. पण आता बर्ड फ्लूच्या भितीने या खवय्यांचे वांदे झाले आहेत. खरंतर कावळे, बगळे मरू लागल्याच्या बातम्या कानावर पडल्यानंतर कालच्या रविवारपासूनच अनेकांची पावले चिकन शॉपऐवजी मटण शॉप्सकडे वळल्याचे दिसून आले होते. मासळी बाजारातही नेहमीपेक्षा गर्दी होती. आता राज्यात बर्ड फ्लू आल्याने साहजिकच मासे, मटणावर भर वाढणार आहे. मार्गशीर्ष संपायला अजून दोन दिवस आहेत. पण त्यानंतर मासळी बाजार हाऊसफुल्ल होण्याची शक्यता आहे. संभाव्य गर्दीचा अंदाज घेऊन मटण विक्रेत्यांनीही कोरोना नियमावली ध्यानात घेत आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
काळजी घ्या!
बर्ड फ्लूचा आजार हा अत्यंत धोकादायक असून याचा मृत्युदर हा 10 ते 12 टक्के इतका आहे. कोरोनापेक्षा ‘बर्ड फ्लू’चा मृत्युदर हा जास्त असल्याचे दिसून येत आहे. हे लक्षात घेता राज्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. कोरोना संसर्गाने होणाऱया मृत्यूंपेक्षा ‘बर्ड फ्लू’ने पक्ष्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण हे अधिक आहे. हा आजार अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात हायअॅलर्ट जारी करायला हवा. पशुसंवर्धन व आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना सुरू करायला हव्यात, असे राजेश टोपे म्हणाले.
अंडी खायची की नाहीत?
बर्ड फ्लूमुळे कोंबड्या खाताना भीती वाटणे स्वाभाविक आहे. अनेक जण कोंबड्या आणि अंडय़ांकडे बघणारही नाहीत. पण इतके घाबरण्याचे कारण नाही. अंडी खा आणि कोंबड्याही बिनधास्त खा, पण उकळून आणि शिजवून खा असा सल्ला राज्याच्या पशू व मस्त्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील किंबहुना देशातील स्वयंपाकाची पद्धत इतकी चांगली आहे की आपण जेवण शिजवून खातो. इतक्या तापमानात बर्ड फ्लूचा विषाणू जिवंतच राहू शकत नाही. कोंबड्या शिजवून खा आणि अंडी उकडून खा असे डॉ. पातुरकर यांनी सांगितले आहे.
- महाराष्ट्रातील पोल्टी उद्योगाची आर्थिक उलाढाल वार्षिक 1400 कोटी रुपये आहे. बर्ड फ्लूमुळे मात्र या उद्योगावर महासंकट आले आहे.
- गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून दिवसाला 10-15 कोटी रुपयांचा तोटा सहन करून व्यवसाय करावा लागत आहे. त्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने आता धंदाच बुडण्याची भीती आहे.


























































